तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करा, मराठा आंदोलकांना मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; मनोज जरांगेंना जबर दंड ठोठावण्याचाही इशारा


मुंबईः मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या टीमला आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी बजावूनही जरांगे पाटील यांनी आझाद मैदान सोडण्यास नकार दिला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांना आज दुपारी २.४० वाजेपर्यंत मुंबई सोडण्याची वेळ दिली आहे. त्यानंतरही त्यांनी मुंबई सोडली नाही तर कारवाई करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कारवाईचे आदेश दिले आहेत. लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांनी आज दुपारी २.४० वाजेपर्यंत रस्ते रिकामे करून मुंबई सोडावी. या मुदतीत त्यांनी मुंबई सोडली नाही तर ३ वाजेनंतर कारवाईला सुरूवात करा, असे आदेश उच्च न्यायालायाने राज्य सरकारला दिले आहेत.

…तर जरांगेंना जबर दंड लावू

आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाही. त्यामुळे पुढील दोन तासांत म्हणजे आज (२ सप्टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई सुरळीत करा. आंदोलकांना आदेशाचे पालन करायला सांगा, अन्यथा आम्हाला न्यायालायाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी लागेल आणि मनोज जरांगे पाटील यांना जबर दंड लावण्याचाही आदेश द्यावा लागेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आम्ही रस्त्यावर जाऊन आढावा घेऊ

स्थानिक मुंबईकरांना शांततेत राहू द्या. तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करा, असे आदेशही उच्च न्यायालायाने मराठा आंदोलकांना दिले आहेत. केवळ पाच हजार जणांची परवानगी असताना काय काळजी घेतली? असा सवाल न्यायालयाने आंदोलकांच्या वकिलांना विचारला. आंदोलकांकडे परवानगी नाही. त्यामुळे २.४० वाजेपर्यंत तत्काळ जागा रिकामी करा. आम्हाला तीन वाजेपर्यंत सर्वकाही सुरळीत झालेले हवे. अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन आढावा घेऊ, असे उच्चन न्यायालयाने निक्षून सांगितले.

आधीच बजावली होती नोटीस

मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. ही नोटीस मिळाल्यानंतर आम्हाला आझाद मैदानावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यास महागात पडेल. तुम्ही कोणत्याही थराला जा, मी काही आझाद मैदानावरून हलणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली होती. परंतु आता उच्च न्यायालयानेच त्यांना ३ वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिल्यामुळे मनोज जरांगे पाटील आता काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!