मराठा हेच कुणबी? नेमके काय आहे हैदराबाद गॅझेट?


मराठा आरक्षणाचा विषय ज्या-ज्या वेळी येतो, त्या वेळी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख होतो. हैदराबाद गॅझेटचा उल्लेख मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी ही केला आहे. त्यामुळे हे हैदराबाद गॅझेट नक्की काय आहे? हे समजून घेणे महत्वाचे आहे.  

प्रा.डॉ.पुंडलिक कोलते, छत्रपती संभाजीनगर

हैदराबाद संस्थानात (आजचे मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग) निजामाच्या अंमलाखाली १७ जिल्हे होते. त्यात सध्याच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश होता. त्यावेळी म्हणजे १८६२ मध्ये ब्रिटीश अधिकारी रिचर्ड मिड यांनी जनगणना केली होती. त्याची सुरूवात १८५० च्या दरम्यान करण्यात आली होती. १८८१ मध्ये जनगणनेचे रेकॉर्ड प्रकाशित करण्यात आले होते. जनगणनेचा हा प्रकाशित शासकीय दस्तावेज म्हणजेच ‘हैदराबाद गॅझेट’ किंवा ‘हैदराबाद गॅझेटियर’.

निजामशाही काळात विविध जाती-जमातींविषयी प्रशासकीय नोंदी केल्या जात असत. त्या नोंदींमध्ये सामाजिक,  शैक्षणिक, आर्थिक व जातीसंबंधी माहिती हैदराबाद गॅझेटियरमध्ये (Hyderabad Gazetteers) प्रसिद्ध होत होत्या. या गॅझेटमध्ये ‘मराठा-कुणबी’ उल्लेख ठळकपणे आढळून येतो. या नोंदीमध्ये जातीशिवाय कोण विवाहित, कोण अविवाहित, विधूर याचाही उल्लेख आढळतो.

निजामाच्या अधिपत्याखाली त्यावेळी असलेल्या १७ जिल्ह्यांची लोकसंख्या जवळपास ९८ लाख ४५ हजाराच्या घरात होती. त्यात कुणब्यांची संख्या ही जवळपास १६ लाखांच्या घरात होती. तर मराठा लोकसंख्या ४ लाखांच्या घरात होता. मराठा आणि कुणबी यांचा उल्लेख करताना या गॅझेटमध्ये मराठा कुणबी कापू असा उल्लेख आहे. शेती करणारे म्हणजे कुणबी मराठा असाही स्पष्ट उल्लेख या ब्रिटिशकालीन गॅझेटमध्ये आहे.

कुणबी मराठा याचा उल्लेख जुन्या रेकॉर्डमध्ये आढळून येतो. त्यामुळे जे कुणबी मराठा आहेत. ते आरक्षणासाठी किंवा प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरू शकतात. हैदराबाद गॅझेट म्हणजे ब्रिटीशकालीन भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येचा इतिहास. विशेष म्हणजे हे रेकॉर्ड ज्यावेळी हे जिल्हे महाराष्ट्रात आले त्यावेळी ते तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले गेले होते. त्यामुळे ते रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे.

हैदराबाद गॅझेटमध्ये ‘मराठा व कुणबी हे एकाच सामाजिक गटाचे दोन भिन्न वर्ग’ असल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत.  कुणबी हा प्रामुख्याने शेतकरी वर्ग होता, तर त्याच्यापैकी काहींनी लष्करी सेवा, प्रशासकीय सेवा स्वीकारल्यावर ‘मराठा’ म्हणून त्यांची ओळख प्रचलित झाली होती. गॅझेटमध्ये असे म्हटले आहे की, मराठा आणि कुणबी यांच्या रूढी-परंपरा, विवाहपद्धती,  भाषा, पोशाख, आहार, देवदेवता यामध्ये फारसा फरक नाही. कुणबींपैकी ज्यांनी सैनिकी व प्रशासकीय स्थान मिळवले ते स्वतःला मराठा म्हणू लागले.

निजामशाही सैन्यात आणि दरबारात अनेक मराठा घराणी होती. याच कारणामुळे गॅझेटमध्ये मराठा हा वेगळा आणि कुणबी हा शेतकरी समाजातील एक भाग, पण दोघे एकमेकांशी निगडित आहेत, असे लिहिलेले आढळते. ‘Maratha and Kunbi are not distinct castes, they are subdivisions of the same stock.’ ‘Kunbi is the cultivating branch of the Maratha community.’ म्हणजेच कुणबी हा मराठा समाजाचा कृषिक शाखा आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे हैदराबाद गॅझेट अतिशय महत्त्वाचा आधार ठरत आहे.  कारण आरक्षण व सामाजिक मागासवर्गीय संशोधनासाठी या गॅझेटमधील उल्लेख महत्त्वाचे ठरतात. मराठा-कुणबी यांचे ऐतिहासिक नाते व सामाजिक ओळख याला अधिकृत हैदराबाद गॅझेट या कागदपत्रातून आधार मिळतो.

१८८२ च्या पुणे जिल्हा गॅझेटरमध्ये, ‘कुणबी’ आणि ‘मराठा’ हे दोन्ही शब्द समांतर वापरलेले आहेत आणि कुणबी कथित कृषिक वर्ग, तर मराठा म्हणजे त्यातील विशिष्ट स्तराचे लोक असे विभाजन दिसतो. अर्थात Maratha-Kunbi caste complex ही संकल्पना त्या काळात अस्तित्वात होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही मराठा आणि अस्पृश्यांचा आर्थिक आणि सामाजिकदृष्टीने विचार व्हायला पाहिजे असे १९२७ मध्ये म्हटले होते. महात्मा फुले यांनीही शेतकऱ्यांचा आसूडमध्ये भाऊ हिश्श्याच्या माध्यमातून कुणब्यांची आवस्था काय आहे, हे मांडले होते.  वाय. जी. गुरुय यांच्या मते, कुणबी हे कृषिकारक वर्ग, तर मराठा हे त्यातील संस्कृतायन (Sanskritisation) करून क्षत्रियत्व प्राप्त करणारे, असे बदल घडले. ज्यामुळे दोन्ही गटांनी एकमेकांशी जोडलेले समाज म्हणून रुप घेतले.

हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट अनेक मराठा-लाभार्थींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एक आधार म्हणून वापरण्याचा एक राजमार्ग आहे. कारण राज्य सरकारने स्थापन केलेल्या न्या. संदीप शिंदे समितीने गॅझेट्स मध्ये नमूद ५८ लाख कुटुंबांच्या नोंद तपासल्या.  त्यातील काहींना २.३९ लाख कुणबी प्रमाणपत्रे आधीच देण्यात आलेली आहेत. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचे त्या काळातील अधिकृत शासकीय दस्तऐवज म्हणून असलेले ऐतिहासिक महत्व सध्याच्या मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढ्यात महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. मराठा समाजाला कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातप्रमाणपत्र मिळवण्यासाठी तोच भक्कम आणि कायदेशीर आधार ठरणार आहे.

(लेखक सामाजिक व राजकीय प्रश्नांचे अभ्यासक आणि विश्लेषक आहेत.)

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!