धक्कादायक: मंजूर आराखड्यानुसार झालेच नाही विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे काम, मूळ डिझाईनमध्ये कंत्राटदाराने केले परस्पर बदल; आंबेडकरवाद्यांच्या भावनांशी खेळ!


छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते आणि विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याशी संगनमत करून खिसे भरल्याची बाब उघडकीस आली असतानाच या स्मारकाचे काम मंजूर आराखड्यानुसार न करता कंत्राटदाराने मूळ डिझाईनमध्ये परस्पर बदल केल्याचे धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत.

तब्बल १७ वर्षे चाललेल्या मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात अनेक नामांतरवाद्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाल्यानंतर तब्बल २९ वर्षांनंतर विद्यापीठ परिसरात नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम सुरू झाले. सुशील देशमुख अँड असोसिएट्स या वास्तुविशारदाकडून नामांतर शहीद स्मारकाचे डिझाईन तयार करून घेण्यात आले आणि हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पांतर्गत प्रियंका रोहित नावंदर या कंत्राटदाराला देण्यात आले.

हेही वाचाः विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, गंभीर संरचनात्मक त्रुटींमुळे लोकार्पण होण्याआधीच झुकला स्मारकाचा मुख्य स्तंभ!

डिसेंबर २०२२ मध्ये वास्तुविशारदाने रेखाटलेले प्रस्तावित नामांतर शहीद स्मारकाचे आर्किटेक्चरल ड्रॉइंग आणि प्रेझेंटेशन ड्राइंग म्हणजेच बांधकाम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष हे स्मारक कसे दिसेल याचे मानचित्र तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकारांबरोबरच आणि विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीतही दाखवले होते. १६०० मीटर परिसर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या नामांतर शहीद स्मारकात जमिनीपासून ३२ फूट उंचीचा मुख्य स्तंभ हे स्मारकाचे मुख्य आकर्षण होते. परंतु कंत्राटदार प्रियंका रोहित नावंदर यांनी या मुख्य स्तंभाच्या उभारणीत संरचनात्मकदृष्ट्या गंभीर स्वरुपाच्या घोडचुका केल्यामुळे हा मुख्य स्तंभ ‘पिसाच्या झुलत्या मनोऱ्या’सारखा झुकला. त्यामुळे या शहीद स्मारकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवरच गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारावयाच्या प्रस्तावित नामांतर शहीद स्मारकाचे मूळ प्रेझेेंटेशन ड्रॉइंग म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष स्मारक कसे दिसेल त्याचे चित्र. तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हेच ड्रॉइंग पत्रकारांना उपलब्ध करून दिले होते. विद्यापीठाच्या अधिकार मंडळांच्या बैठका आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनाही हेच ड्रॉइंग दाखवत नामांतर शहीद स्मारक असे आकर्षक असेल असे सांगितले होते. त्याला सर्वांनीच मान्यता दिली होती.

वास्तुविशारदाने तयार केलेल्या मूळ प्रेझेंटेशन ड्रॉइंगमध्ये दिसणारे नामांतर शहीद स्मारक आणि कंत्राटदाराने प्रत्यक्ष उभारलेले नामांतर शहीद स्मारक यात जमीन- अस्मानचा फरक आहे. मूळ प्रेझेंटेशन ड्रॉइंगमध्ये या शहीद स्मारकात १०० चौरस मीटरचा एक्झिबिशन हॉल, या हॉलसाठी प्रशस्त एन्ट्रन्स लॉबी, या हॉलमध्ये सूर्यप्रकाश यावा म्हणून स्लॅब कट करून त्या स्लॅब कटवर बौद्ध स्तुपाच्या आकाराचा पारदर्शक घुमट दर्शवण्यात आला आहे. कंत्राटदाराने प्रत्यक्ष उभारलेला एक्झिबिशन हॉल मूळ प्रेझेंटेशन ड्रॉइंगच्या अगदीच विपरित आहे. एन्ट्रन्स लॉबीशी छेडछाड केली आहे आणि स्लॅब कटवर बौद्ध स्तुपाच्या आकाराचा पारदर्शक घुमट उभारण्याऐवजी थडग्याच्या आकाराचा सिमेंट डोम उभारण्यात आला आहे.

हेही वाचाः नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असताना विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याने झोपा काढत केली कर्तव्यात कसूर, कुलगुरू कारवाई करणार का?

मूळ आर्किटेक्चरल ड्रॉइंग आणि वर्किंग ड्रॉइंग म्हणजे कामगार आणि कंत्राटदारांनी प्रत्यक्ष काम करताना वापरायचे डिझाईनमध्ये या शहीद स्मारकात ४.९ फूट रुदींचा पाथवे दाखवण्यात आलेला आहे. कंत्राटदाराने प्रत्यक्ष उभारलेल्या पाथवेची रुंदीही कमी आहे. विशेष म्हणजे मूळ प्रेझेंटेशन ड्रॉइंगमध्ये दर्शवण्यात आलेली या शहीद स्मारकाची कंपाऊंड वॉल म्हणजेच संरक्षक भिंत आणि कंत्राटदाराने प्रत्यक्ष उभारलेली कंपाऊंड वॉल यातही फरक आहे. मूळ प्रेझेंटेशन ड्रॉइंगमध्ये विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशदाराकडून मुख्य प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे राहून पाहिले तरी संपूर्ण शहीद स्मारक स्पष्ट दिसेल, अशी या संरक्षक भिंतीची रचना होती. प्रत्यक्षात उभारलेली संरक्षक भिंत कोंडवाड्यासारखी आहे.

मंजूर तपशील, आराखडा, तांत्रिक मानके आणि गुणवत्तेचे निकष अशा सर्वच्या सर्व बाबी धाब्यावर बसवून कंत्राटर प्रियंका रोहित नावंदर हे कंत्राटदार मनमानी पद्धतीने ऐतिहासिक नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम दर्जाहीन करून समस्त आंबेडकरवादी आणि नामांतरवादी समुदायाच्या भावनांशी खेळत असताना मात्र या बांधकामावर देखरेख आणि मूळ आराखड्यानुसार बांधकाम होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता रविंद्र काळे डोळे मिटून बसले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंता कोणतीही स्थळ पाहणी न करता प्रियंका रोहित नावंदर या कंत्राटदाराने मागणी केल्याप्रमाणे बिलाच्या रकमा ‘खुशी खुशी’ने देत राहिले. त्यामुळे कंत्राटादाराची भीड चेपली आणि त्याने अर्धवट अवस्थेत असलेले नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम पूर्ण होऊन ही इमारत वापरण्यायोग्य असल्याचा आभास निर्माण करून आजवर तब्बल १ कोटी ९५ लाख ५२ हजार ८५० रुपयांची बिले घशात घातली.

विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांनीही डोळेबंद करून ‘ही इमारत वापरण्यास सज्ज  म्हणजे ‘Building is Put To Use’ असा शेरा मारत यूटिलायझेशन सर्टिफिकेट जारी केले. याचाच अर्थ या शहीद स्मारकाच्या घोटाळ्याला जसा कंत्राटदार प्रियंका रोहित नावंदर जबाबदार आहे, त्याहीपेक्षा जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता रविंद्र काळे हे जबाबदार आहेत. आता त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार की नाही? याकडे आंबेडकरी समुदायाचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!