
नवी दिल्ली: नीट परीक्षेतील घोटाळे आणि देशातील ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलेल्या आंदोलनाला आज नवीन धार चढली. सीजेपीने संसद भवनावर आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. दरम्यान, संसद भवन परिसरात आंदोलक शिरण्याच्या धास्तीने संसद भवनाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
जंतर-मंतरवरून कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात लाखोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले आहेत. हे आंदोलक जंतर-मंतरवरून संसद भवन परिसरात पोहोचले. रेल भवनच्या बाजूच्या गेटजवळ पोहोचलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत.
सीजेपीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे संसद भवनाकडे जाणारे सर्व रस्ते आंदोलकांनी ओसंडून वाहात आहेत. एकीकडे आंदोलक संसद भवनाच्या दिशेने कूच करत असतानाच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी अटक केल्याची अफवा परसली होती. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी ट्विट करून या अफवेचे खंडन केले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना अटक झालेली नाही किंवा पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलेले नाही. पण दिल्लीतील केरला हाऊसवर अजूनही मोठ्या संख्येने आंदोलक जमा झालेले आहेत, असे सौरव दास यांनी म्हटले आहे.
हा मोर्चा सुरू झाल्यानंतर गेली कित्येक दिवस या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. सीजेपीच्या वतीने आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी दुपारी १२ वाजता नड्डा यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी दहा मिनिटे चर्चा केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा, सोनम वांगचुक यांच्या हाचलाचींवर कोणतेही निर्बंध न घालता त्यांची तत्काळ सुटका करावी आणि नीट-२०२६ च्या पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत करावी, अशा तीन मागण्यांचे पत्र त्यांनी नड्डा यांच्याकडे सोपवले.
योग्य पातळीवर चर्चा करतो, असे नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाला सांगितले. परंतु त्यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील, असे सौरव दास यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, जंतर-मंतर व आसपासच्या परिसरात यापुढे कोणतीही पोलिस कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही मंत्र्यांनी दिले. मात्र अद्याप पोलिसांनी कारवाई थांबवल्याचे कोणतेही वृत्त नाही, असेही सौरव दास यांनी म्हटले आहे.
धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचल्याचे वृत्त आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील मात्र बाहेर आलेला नाही.
शांततापूर्ण मार्गाने संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या सीजेपीच्या आंदोलनकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले.पहा व्हिडिओः
