
छत्रपती संभाजीनगरः दिल्लीत क्रॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलेल्या आंदोलनाचे जोरदार पडसाद आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमटले. सीजेपीने आज दिल्लीत संसद भवनावर मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने तरूणाईचा सागर रस्त्यावर ओसंडून वाहिला. या मोर्चाच्या समर्थनार्थ आज छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शेकडो तरूण गोळा झाले आणि त्यांनी जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत अभिजीत दिपके व सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन केले.
सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारलेल्या क्रांतीचौकातील या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या आंदोलनात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशिवाय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, मानव्य विद्याशाखांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनात सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कल्पक घोषवाक्य असलेले प्लेसकार्ड हातात घेतले होते. या आंदोलनकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही या आंदोलकांची मुख्य मागणी होती. तरूणांच्या भविष्याशी खेळणारी हुकुमशाही, यासह सरकारविरोधी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीचा निषेध अशा विविध घोषणांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलन करणारे पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी दिलेल्या अमानुष वागणूक दिली. या दडपशाहीचा तीव्र निषेध करत देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, असा या आंदोलक विद्यार्थ्यांचा आग्रह होता.

आज सकाळपासूनच क्रांती चौकात विद्यार्थी जमायला सुरूवात झाली. विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री राजीनामा द्या, सोनम वांगचुक यांच्यावरील दडपशाही थांबवा, अशा विविध घोषणा देऊन आंदोलक विद्यार्थ्यांनी क्रांती चौक दणाणून सोडला.
अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत. मात्र केंद्र सरकार त्यांची दखल घेत नाही. केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा. नीट पेपरफुटीच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. त्यांचे जीव वाचवण्यासाठी नीट परीक्षेसह शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावी, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि वकील संघटना सहभागी झाल्या होत्या.
