दिल्ली पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला आणि काठ्या चालवल्याः अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप, आता चर्चा करायची असेल तर जंतर-मंतरवरच!


नवी दिल्लीः  नीट पेपरफूट आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन सुरू असून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी चर्चेसाठी केंद्र सरकारसमोर नवीन अट ठेवली आहे. आता आमचे शिष्टमंडळ केंद्र सरकारशी चर्चा करायला जाणार नाही, त्यांना चर्चा करायचीच असेल तर त्यांनी जंतर-मंतरवर यावे, असे अभिजीत दिपके म्हणाले. त्यामुळे नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवर ३२ दिवसांपासून म्हणजेच २० जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. २८ जूनपासून जागतिक किर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक हे जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसले. त्यांचे आमरण उपोषण अद्यापही सुरूच आहे. काल २० जून रोजी सीजेपीने संसद भवनावर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात देशभरातील तरूण लाखोंच्या संख्येने सुरू झाले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या तरूणांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज पत्रकारांसमोर या आंदोलनाविषयीची भूमिका मांडली आणि आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही जाहीर केले.

काल (२० जुलै) दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ज्याप्रकारे मारहाण केली, तो प्रकार लज्जास्पद होता. मोर्चा रोखायचा होता तर पोलिसांना पाण्याचे फवारे वापरता आले असते. पण पोलिसांनी १२ वर्षांच्या मुलीचे डोके फोडले. तरूणींच्या छातीवर पुरूष पोलिसांनी पाय दिले. त्यांना मारहाण केली. त्यांचे गळे धरले, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.

दिल्ली पोलिसांनी तरूणींना३ अमानुषपणे मारहाण केली. एका १२ वर्षांच्या मुलीचे डोके फोडले. १५-१६ वर्षांच्या मुलींचे गळे पकडले. एका मुलीला पोलिस मारहाण करताना मी स्वतः बघितले. पोलिसांनी या मुलीचे कपडे फाडले आणि तिच्या छातीवर पाय देऊन काठ्या चालवल्या. एका मुलीच्या गळ्यावर पोलिसांनी काठीचे फटके दिले. त्यामुळे ही मुलगी गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे दिपके म्हणाले.

दिपके यांनी केंद्र सरकारवरही टिकास्त्र सोडले. देशात मोदी-शहांनी पोलिसांना गुंड बनवले. हे कधीपर्यंत चालणार आहे? २० मुलांच्या आत्महत्येनंतरही त्यांचे समाधान झाले नाही, हे आज त्यांनी दाखवून दिले. त्यामुळेच पोलिसांना तरूणांची डोकी फोडण्याचे, हात-पाय तोडण्याचे आदेश देण्यात आले, असे दिपके म्हणाले.

दिल्ली पोलिसांना आंदोलनातील विद्यार्थ्यांचे खून करायचे आदेश होते का? धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आणखी मुलांचे खून करायचे आहेत का?, असे सवाल दिपके यांनी उपस्थित केले. आमच्या प्रत्येक आंदोलकांच्या बॅगा तपासल्या जात होत्या. अशा परिस्थितीत जंतर-मंतरवर ट्रक भरून दगड कुठून आले? याचे उत्तर दिल्ली पोलिसांनी द्यावे. पोलिसांना नेमप्लेट काढून मुलांवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते, असा गंभीर आरोपही दिपके यांनी केला.

काल संसद भवनावरील मोर्चा सुरू असतानाच सीजेपीचे दोन प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. त्याबद्दल विचारले असता दिपके यांनी नड्डा यांच्यासोबतची बैठक म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय होता. एकीकडे चर्चा करायची आणि दुसरीकडे मारहाण करायची असा तो प्रकार होता, असे दिपके म्हणाले.

आता सीजेपीचे शिष्टमंडळ सरकारकडे जाणार नाही. त्यांना चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर-मंतरवर यावे, अशी नवीन अटही दिपके यांनी घातली. त्यामुळे सीजेपीचे आंदोलन २०११ मध्ये लोकपालच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाच्या मार्गाने जाणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची आणि आंदोलन करण्याची गरजच काय? असा सवाल भाजप नेते उपस्थित करत आहेत. त्याबाबत विचारले असता अभिजीत दिपके यांनी भाजप-जनसंघाचा इतिहासच काढला. भाजप आणीबाणीत रस्त्यावर का उतरला होता? आता सत्तेत बसलेला पक्ष तेव्हा काय करत होता? भाजप हा पक्षही आंदोलनातून जन्माला आला आहे. जनसंघातूनच भाजपची स्थापना झाली, असे दिपके यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!