नागपूर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी रेल्वे स्थानकावर उभ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यामधील प्रवाशांशी संवाद साधला. तसेच या एक्सप्रेस गाडीच्या कॅबिनलाही भेट देवून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुख्य कार्यक्रमस्थळी त्यांनी या एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी उपस्थित मान्यवर, विद्यार्थ्यांसह रेल्वे अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी टाळयांच्या गजराने या एक्सप्रेस गाडीला निरोप दिला.
वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते बिलासपूर हे अंतर अवघ्या साडेपाच तासात गाठता येणे शक्य होणार आहे. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे मार्गावर ही एक्सप्रेस चालवली जाणार आहे. वेगवान प्रवासासोबत सुरक्षेची काळजी घेण्यात आलेल्या या एक्सप्रेस गाडीला १६ कोच असून या गाडीची आसनक्षमता १ हजार १२८ आहे. नागपूर ते बिलासपूर दरम्यान या गाडीला फक्त गोंदिया, दुर्ग आणि रायपूर एवढेच थांबे देण्यात आले आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस गाडीविषयीः
- आज प्रारंभ झालेली देशातील ही सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे.
- स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय अभियंत्यांच्या क्षमतेची साक्ष आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे फलित आहे.
- या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्वाची शहर जोडली जाणार.
- नागपूर-बिलासपूर एकूण अंतर ४१२ किलोमीटर आहे. हे अंतर कापण्यासाठी ५.३० तास प्रवास करावा लागणार आहे.
- उभय शहरांदरम्यान आठवड्यातून ६ वेळा धावणार वंदे भारत एक्सप्रेस (शनिवारी सेवा बंद असणार)
- गाडीला एकूण १६ कोच असून प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांच्या माहितीसाठी ३२ इंचीच्या डिजिटल स्क्रिन.
- प्रवासी घेणार वेगवान व सुरक्षित प्रवासाचा अनुभव. विमान प्रवासाचा अनुभव देतानाच ‘कवच’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या एक्सप्रेस गाडीत सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांची माहिती आणि इंफोटेनमेंट उपलब्ध आहे. दिव्यांग प्रवाशांची विशेष काळजी घेण्यात आली आहे, ठीक -ठिकाणी ब्रेल लिपीतून माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत. टच फ्री सुविधांसह व्हॅक्यूम प्रसाधनगृहे, उच्च कार्यक्षमतेच्या कॉप्रेसरद्वारे उत्कृष्ट व्हेंटिलेशन आणि वातानुकूलन नियंत्रण राखण्यात आले आहे.