
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यीपठातील अधीक्षक शेख सिकंदर अली हिम्मत अली हे तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचे जवळचे मित्र प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी व्यक्त केलेल्या या भावना…
- प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर
माझा अत्यंत जवळचा मित्र शेख सिकंदर अली हिम्मत अली नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जवळपास तीस वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून अधीक्षक या पदावरून ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. खरं सांगायचं तर सिकंदरच्या या सेवानिवृत्तीकडे मला केवळ एका सहकाऱ्याची सेवानिवृत्ती म्हणून पाहता येत नाही. कारण आमचं नातं विद्यापीठाच्या नोकरीपासून सुरू झालेलं नाही. त्याच्या खूप आधीपासून म्हणजे आमच्या कॉलेजच्या दिवसांपासून आम्ही एकमेकांच्या आयुष्याचे साक्षीदार आहोत.
सिकंदर माझ्यापेक्षा वयाने मोठा. त्यामुळे तो माझा मित्र तर होताच, पण अनेक प्रसंगी मोठ्या भावासारखा मार्गदर्शकही होता. परभणी येथील श्री शिवाजी कॉलेजच्या त्या दिवसांत आम्ही दोघांनी आपापल्या आयुष्याची अनेक स्वप्नं एकत्र पाहिली. परिस्थिती फार अनुकूल नव्हती. संघर्ष होते, अडचणी होत्या, भविष्याबद्दल अनिश्चितता होती परंतू त्या परिस्थितीला घाबरून न जाता तिला कसं सामोरं जायचं, हे मला सिकंदरकडून शिकायला मिळालं.
माझा स्वभाव काहीसा भावनिक. सिकंदरने मला अनेकदा समजावून सांगितलं की आयुष्यात भावना महत्त्वाच्या असतातच, पण व्यवहाराचं भानही तितकंच महत्त्वाचं असतं. बिकट परिस्थितीमध्ये स्वतःला कसं सावरायचं, निर्णय कसे घ्यायचे, संकटाला धीराने कसं सामोरं जायचं या अनेक गोष्टी त्याने मला शिकवल्या.
माझ्या आयुष्यातील आणीबाणीच्या, अडचणीच्या आणि संकटाच्या अनेक प्रसंगी सिकंदर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याने मला शक्य ती सर्व प्रकारची मदत केली. काही नाती आपण ठरवून निर्माण करत नाही. ती काळाच्या ओघात इतकी घट्ट होत जातात की नंतर ती आपल्या आयुष्याचाच एक अविभाज्य भाग बनतात. सिकंदरसोबतचं माझं नातं असंच आहे.
त्याचं घरही माझ्यासाठी कधी परकं नव्हतं. त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण या सगळ्यांनीच आम्हाला आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखं प्रेम दिलं. विशेषतः त्याच्या आईने आमच्यावर केलेलं प्रेम आजही विसरता येणार नाही. ईद आली आणि आम्ही सिकंदरच्या घरी गेलो नाही, असं जवळजवळ कधी घडलंच नाही. त्या घरात गेल्यानंतर आपण मित्राच्या घरी आलो आहोत असं वाटत नसे, आपल्याच घरात आलो आहोत अशी भावना असायची. ईद हा आमच्यासाठी केवळ एक सण नव्हता, तो जणू वर्गातील आम्हा सर्व मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन मैत्री साजरी करण्याचा एक सुंदर उत्सवच होता. आता ही मी ईद च्या दिवशी सिकंदर च्या घरी जातो. वहिनीही तितक्याच आपुलकीने आमचं स्वागत आणि आतिथ्य करतात. सिकंदरच्या संसाराकडे पाहतानाही मला विशेष समाधान वाटतं. त्याची मुलं उच्चशिक्षित आहेत, आपापल्या क्षेत्रात कर्तृत्ववान आहेत. विशेष आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती अत्यंत विनम्र आणि संस्कारशील आहेत.
आम्ही दोघेही विचाराने खूप रॅशनल होतो. तरीही रमजानच्या महिन्यात मी काही रोजे सिकंदरसोबत ठेवले. माझ्यासाठी तो केवळ धार्मिक अनुभव नव्हता. मित्राच्या श्रद्धेच्या आणि जगण्याच्या एका अनुभवात सहभागी होण्याचा तो प्रयत्न होता. आज इतक्या वर्षांनंतर त्या दिवसांकडे पाहताना जाणवतं की, मैत्री आपल्याला केवळ माणसाशी जोडत नाही, तर ती आपसूकपणे आपल्याला त्याच्या जगाशीही जोडते.
पुढे आम्ही पदव्युत्तर शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकायला गेलो. त्या काळातील एक आठवण आजही मनात अगदी ताजी आहे. सिकंदर रात्री उशिरा परभणीहून ट्रेनने विद्यापीठाच्या होस्टेलवर पोहचायचा. आम्ही खास त्याची वाट पाहत असू कारण तो दरवेळी घरून मोठा डबा घेऊन यायचा. रात्री उशिरा आम्ही सगळे मित्र एकत्र बसून तो डबा खात असू. आज विचार केला तर त्या डब्यात आम्हाला आवडणारं नॉनव्हेज तर असेच पण त्यात आपुलकी होती, काळजी होती, मैत्री होती आणि जेवताना पाहिलेली उद्याच्या आयुष्याची अनेक स्वप्नंही होती. याच काळात सिकंदर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सेवेत रुजू झाला. त्याला विद्यापीठात नोकरी मिळाली आणि माझ्याही मनात एक स्वप्न निर्माण झालं. कधीतरी मीसुद्धा याच विद्यापीठात येईन आणि आपण दोघे पुन्हा एकत्र काम करू.
खरं तर आयुष्याची श्रीमंती केवळ आपण किती कमावलं, कोणत्या पदावर पोहोचलो किंवा किती प्रतिष्ठा मिळवली यात मोजता येत नाही. आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर किती माणसं आपली राहिली आणि आपण किती माणसांचे राहिलो, यातही ती मोजावी लागते…
आम्ही तरुणपणी पाहिलेलं ते स्वप्न पुढे प्रत्यक्षात आलं. मीही याच विद्यापीठात आलो आणि आम्हाला एकाच विद्यापीठात दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळाली. आयुष्यात काही स्वप्नं पूर्ण होतात तेव्हा आनंद होतो. तथापि तरुण वयात मित्रासोबत पाहिलेलं एखादं स्वप्न तीस वर्षांनंतर आठवण बनून आपल्यासमोर उभं राहतं, तेव्हा त्या आनंदाला एक वेगळीच भावनिक किनार असते.
आमची मैत्री मात्र फक्त आम्हा दोघांपुरती कधीच नव्हती. आमच्या भोवती मित्र-मैत्रिणींचं एक सुंदर विश्व होतं. सुरेश शेळके, साईनाथ बोराळकर, सुनील शेळके, तानाजी देशमुख, राजेश मणुरे, शेख शहाबुद्दीन, सुरेश धनवडे, सुजित अबोटी, त्र्यंबक गायकवाड, दिनकर लटपटे, महेश जोशी, संजीव अढागळे, संतोष गायकवाड, श्याम परदेशी, उत्तम कऱ्हाळे, रमेश चव्हाण, दिवंगत जे.डी. वाघमारे आणि आमच्या वर्ग मैत्रिणी प्रतिभा शिंदे, अनुराधा महाजन, ज्योती अघोर, स्मिता जोशी, वैशाली देवकर, शोभा कौसल्ये, वैशाली मंगरुळकर, ज्योती धुतमल, राणी संघई आणि अंजली खडके या सगळ्यांनी मिळून आमच्या कॉलेजच्या दिवसांना एक वेगळंच सौंदर्य दिलं.
आज मागे वळून पाहताना जाणवतं की त्या काळात आमच्याकडे भौतिक अर्थाने कदाचित फार काही नसेल पण माणसांच्या बाबतीत आम्ही खूप श्रीमंत होतो. या प्रत्येक मित्राने आणि मैत्रिणीने आपल्या स्नेहाने, आपुलकीने, सहवासाने आणि निखळ मैत्रीने आमच्या आयुष्यात काही ना काही जोडले. एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं, अडचणीच्या काळात सोबत उभं राहणं, एकमेकांची चेष्टा-मस्करी करणं, भांडणं, पुन्हा एकत्र येणं आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय एकमेकांची काळजी घेणं, ही त्या मैत्रीची खरी ताकद होती. आणि मला सर्वांत महत्त्वाचं वाटतं ते हे की, इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही आमच्यातील मैत्री आणि स्नेहसंबंध टिकून आहेत.
काळ पुढे गेला. प्रत्येकाचे संसार झाले, नोकऱ्या-व्यवसाय आले, जबाबदाऱ्या वाढल्या. प्रत्येकाच्या आयुष्याचे रस्ते वेगवेगळ्या दिशांना गेले. भेटीगाठी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. असे असले तरी एकमेकांविषयीची आपुलकी कमी झाली नाही. आजही एखादा फोन आला, एखादी भेट झाली किंवा जुन्या आठवणींचा एखादा विषय निघाला की मधली इतकी वर्षं क्षणात नाहीशी होतात आणि आम्ही पुन्हा त्या कॉलेजच्या दिवसांत जाऊन पोहोचतो.
खरं तर आयुष्याची श्रीमंती केवळ आपण किती कमावलं, कोणत्या पदावर पोहोचलो किंवा किती प्रतिष्ठा मिळवली यात मोजता येत नाही. आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर किती माणसं आपली राहिली आणि आपण किती माणसांचे राहिलो, यातही ती मोजावी लागते.त्या अर्थाने आम्ही सगळेच खूप श्रीमंत आहोत.
सिकंदरच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे त्याला असलेली शेरो-शायरीची आवड. एखादा चांगला शेर ऐकला की तो मित्रांना सांगितल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. त्याचबरोबर मित्रांना खाऊ-पिऊ घालण्यात त्याला विशेष आनंद. आपल्याकडे आलेला मित्र उपाशी परत जाता कामा नये, ही जणू त्याची वृत्तीच. या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याच्या स्वभावातील प्रेमळपणा आणि दिलदारपणा दिसत राहिला.
माझ्या आयुष्यातली आणखी एक मजेशीर आणि जिव्हाळ्याची आठवण म्हणजे मी पहिल्यांदा गाडी चालवायला शिकलो, ती सिकंदरच्याच गाडीवर! आज ते आठवलं की गंमत वाटते. आयुष्यात आपल्याला पुढे जाण्यासाठी अनेक जण दिशा दाखवतात परंतू प्रत्यक्षात स्टेअरिंग आपल्या हातात देऊन, ‘चल, अब तू चला’ असं म्हणणारे मित्र फार थोडे असतात. सिकंदर माझ्यासाठी अशाच मित्रांपैकी एक आहे.
आज त्याच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने विद्यापीठातील त्याच्या जवळपास तीस वर्षांच्या कामाचा गौरव निश्चितच होईल. अधीक्षक म्हणून त्याने सांभाळलेल्या जबाबदाऱ्या, विविध विभागांमध्ये केलेलं काम, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी केलेली धडपड, नियमांच्या चौकटीत राहून शक्य तेवढी मदत करण्याची त्याची भूमिका या सगळ्याची नोंद विद्यापीठाच्या इतिहासात आणि त्याच्या सेवापुस्तकात राहील. पण माझ्या मनातील सिकंदरची नोंद कोणत्याही सेवापुस्तकात मावणारी नाही. कारण माझ्यासाठी सिकंदर त्याच्या पदापेक्षा खूप मोठा आहे.
तो माझ्या कॉलेजच्या दिवसांत आहे. आम्ही एकत्र पाहिलेल्या स्वप्नांत आहे. संकटाच्या वेळी मिळालेल्या आधारात आहे. रमजानच्या त्या रोज्यांमध्ये आहे. ईदच्या आनंदात आहे. त्याने रात्री उशिरा आणलेल्या त्या डब्यात आहे. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांमध्ये आहे. मी पहिल्यांदा चालवलेल्या त्याच्या गाडीत आहे. आणि या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक दशकांच्या आमच्या मैत्रीत आहे.
आज सिकंदरच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने या सगळ्या मित्र-मैत्रिणींची आठवण मनात दाटून येते. कारण सिकंदरची आणि माझी गोष्ट ही केवळ आम्हा दोघांची गोष्ट नाही. ती आपल्या सगळ्यांनी मिळून जगलेल्या एका सुंदर काळाची गोष्ट आहे. काळाने आमच्या वयात वर्षांची भर घातली. केस पांढरे केले. जबाबदाऱ्या वाढवल्या. प्रत्येकाला आपापल्या वाटेने पुढे नेलं. पण त्या काळात जुळलेल्या मैत्रीचे धागे आजही तितकेच जिवंत आहेत. आणि म्हणून आज मागे वळून पाहताना मनापासून वाटतं, आपण आयुष्यात नेमकं किती कमावलं, याचा हिशेब कधीतरी करायचाच झाला, तर बँकेतील आकड्यांपूर्वी आपल्या मित्र-मैत्रिणींची नावं मोजायला हवीत. कारण माणसं हीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती असतात. आज सिकंदर सेवानिवृत्त होत आहे.
नोकरीला रुजू होताना एक तारीख असते आणि निवृत्तीचीही एक तारीख असते. त्यामुळे सेवेला पूर्णविराम देता येतो. पदाचा कार्यकाळ संपतो. कार्यालयातील खुर्ची दुसऱ्या कुणाकडे जाते. सेवापुस्तकातील शेवटची नोंद होते. पण मैत्रीचं सेवापुस्तक नसतं आणि मैत्रीला सेवानिवृत्तीची तारीखही नसते.
प्रिय सिकंदर,
आज मागे वळून पाहताना एवढंच म्हणावंसं वाटतं, आपण तरुणपणी एकत्र पाहिलेली काही स्वप्नं पूर्ण झाली, काही कदाचित राहून गेली. आयुष्याने आपल्याला अनेक चांगले-वाईट अनुभव दिले. काही आनंदाचे क्षण दिले, काही कठीण परीक्षा घेतल्या. पण या सगळ्या प्रवासात आपली मैत्री टिकून राहिली. आपली माणसं टिकून राहिली. माझ्या दृष्टीने हीच आपल्या आयुष्याची फार मोठी कमाई आहे. तुझ्या आयुष्याचा आज एक अध्याय पूर्ण होत आहे आणि दुसरा निवांत, आनंदी आणि सुंदर अध्याय सुरू होत आहे. तुला उत्तम आरोग्य लाभो, कुटुंबासोबत भरपूर आनंदाचे क्षण मिळोत, मित्रांसाठी वेळ मिळो आणि अर्थातच तुझी शायरी, तुझं मित्रांना खाऊ-पिऊ घालणं आणि तुझं आमच्यावरचं प्रेम असंच कायम राहो.
प्रिय सिकंदर, तुझ्या या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
(लेखक नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात प्राध्यापक आहेत.)
