नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्यांचे रॅकेट चालवणारा ‘मास्टरमाइंड’ परिमल गौरकरला अटक; राज्यात याच बनावट पदव्यांवर अनेकांनी मिळवली नोकरी व पदोन्नती!


नागपूर/चंद्रपूरः महाराष्ट्रासह देशातील नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्रांचे राज्यव्यापी रॅकेट चालवणारा कथित मास्टरमाइंड परिमल गौरकर आणि त्याच्या एका साथीदाराला दुर्गापूर पोलिसांनी आज सकाळी नागपुरातील एका घरातून अटक केली. परिमल गौरकरच्या अटकेमुळे बनावट पदव्यांच्या या राज्यव्यापी रॅकेटमधील अनेक पैलू उघडकीस येणार आहेत. विशेष म्हणजे परिमल गौरकरकडून लाखो रुपये देऊन मिळवलेल्या याच बनावट पदव्यांच्या आधारे अनेकांनी शासकीय व निमशासकीय आस्थापनांत नोकरी आणि पदोन्नती मिळवल्याचा संशय असून त्यादिशेनेही तपास केला जाणार आहे.

परिमल बाबुराव गौरकर याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठांसह कोल्हापूर, सोलापूर विद्यापीठांसह राजस्थान आणि कर्नाटकमधील विविध विद्यापीठांच्या बनावट गुणपत्रिका, बनावट पदव्या आणि बनावट स्थलांतर प्रमाणपत्रे (मायग्रेशन सर्टिफिकेट्स) तयार करून त्यांची पाच ते दहा लाख रुपयांत विक्री केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

परिमल गौरकर हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या व बनावट गुणपत्रिकांचे रॅकेट चालवत होता. पाच ते दहा लाख रुपयांत तो या बनावट पदव्यांची विक्री करत होता. राज्यात अनेकांनी त्याच्याकडून बनावट पदव्या आणि गुणपत्रिका विकत घेऊन शासकीय तसेच निमशासकीय आस्थापनांमध्ये नोकरी आणि पदोन्नती मिळवल्याचाही आरोप आहे. त्यामुळे या बनावट पदव्यांच्या आधारे नोकरी आणि पदोन्नती मिळवणाऱ्या व्यक्तींची नेमकी संख्या किती? त्यातील बनावट प्रमाणपत्रे किती? किती आणि कोणत्या शासकीय तसेच निमशासकीय आस्थापनांमध्ये या बनावट पदव्या व गुणपत्रिकांचा वापर झाला? हा तपास करणे पोलिसांसमोरील मोठेच आव्हान ठरणार आहे.

परिमल गौरकर आणि त्याचे साथीदार विविध नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या व गुणपत्रिकांची निर्मिती कशी करत होता? त्यासाठी कोणते तंत्रज्ञान आणि साधने वापरली जात होती?  बनावट पदव्या व गुणपत्रिका तयार करण्यासाठी त्यांना आवश्यक माहिती कोठून मिळत होती आणि या बनावट पदव्या व गुणपत्रिका कोणाकोणाला विक्री करण्यात आल्या? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

परिमल गौरकर हाच या बनावट पदवी प्रकरणातील कथित मास्टरमाइंड असून त्याच्या चौकशीतून बनावट पदव्या आणि गुणपत्रिकांच्या रॅकेटची संपूर्ण साखळीचा उलगडा होण्याची शक्यता आहे. परिमल गौरकर आणि त्याच्या साथीदारांनी तयार केलेल्या बनावट पदव्या व गुणपत्रिका तयार करणारे, त्या खरेदी करणारे आणि शासकीय तसेच निमशासकीय आस्थापनात नोकरी अथवा पदोन्नती मिळवण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा वापर करणारे यांच्यापर्यंत पोलिसांच्या तपासाची चक्रे पोहोचण्याची शक्यता आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सहभागी आहे आणि किती बनावट कागदपत्रे तायार करून त्यामाध्यमातून किती रुपयांची उलाढाल करण्यात आली? याचाही तपास पोलिस करणार आहेत.

कसे फुटले बिंग?

चंद्रपूर येथील वैभव माशीरकर यांनी या बनावट पदव्या व गुणपत्रिकांबाबतची तक्रार दुर्गापूर पोलिस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक संतोष शेगावरकर आणि पोलिस उपनिरीक्षक रवींद्र नक्कानवार यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर पोलिस आरोपींपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. या प्रकरणात आधी वैभव सोनुले या तरूणाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता परिमल गौरकर आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वैभव सोनुले आणि परिमल गौरकर हे दोघे नातेवाईक आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!