
छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी झालेल्या ज्वाजल्य लढ्याचा इतिहास आणि या लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या ज्ञात-अज्ञात शहिदांच्या सन्मानार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांनी झोपा काढत कर्तव्यात कसूर केल्यामुळेच या स्मारकाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. परिणामी या स्मारकाचे लोकार्पण होण्याआधीच गंभीर संरचनात्मक त्रुटीमुळे स्मारकाचा मुख्य स्तंभ झुकला आणि नामांतर चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरी समूहाच्या भावनांशीच खेळण्याचा प्रमाद घडला. त्यामुळे कर्तव्यात गंभीर कसूर करणारे कार्यकारी अभियंता काळे यांच्यावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी कारवाई करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’ असे नामांतर करा, या मागणीसाठी १९७७ ते १९९४ अशी तब्बल १७ वर्षे चाललेल्या ऐतिहासिक नामांतर लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मरणार्थ विद्यापीठात परिसरात नामांतर शहीद स्मारक उभारण्याची मागणी १४ जानेवारी १९९४ विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यापासूनच केली जात होती. परंतु विद्यापीठ प्रशासन त्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. अखेर प्रा. डॉ. बी.ए. चोपडे यांनी त्यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात २०१७ मध्ये विद्यापीठ परिसरात नामांतर शहीद स्मारक उभारण्याची आणि त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली.
या घोषणेनंतर नामांतर शहीद स्मारकाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यास २०२३ साल उजाडले. या स्मारकासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल २ कोटी २५ लाख २८ हजार ५२५ रुपयांची निविदा काढली आणि हे काम प्रियंका रोहित नावंदर या कंत्राटदाराला दिले. परंतु या कंत्राटदाराने लाखो नामांतरवादी आणि आंबेडकरी समुदायाच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या या स्मारकाचे बांधकाम दर्जाहीन करून आपले खिसे भरले.
नियमानुसार, विद्यापीठ परिसरातील कोणतेही बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले गेले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबवून ते काम एखाद्या शासन मान्य कंत्राटदाराला दिले असले तरी ते बांधकाम मंजूर तपशील, तांत्रिक मानके व गुणवत्तेनुसार होत आहे की नाही, याची वेळोवेळी देखरेख करून कामाच्या गुणवत्तेसाठी आग्रही राहण्याची जबाबदारी जशी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, तशी ती त्याहीपेक्षा जास्त विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांची आहे.
नामांतर शहीद स्मारकाचे काम मंजूर तपशील, तांत्रिक मानके आणि गुणवत्तेनुसार होत असल्याचे देखरेखीदरम्यान लक्षात आल्यास तसा अहवाल कुलगुरूंना सादर करून ती बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारीही कार्यकारी अभियंता काळे यांचीच आहे. परंतु २०२३ मध्ये सुरू झालेले नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम प्रारंभापासूनच निकृष्ट दर्जाचे होत असताना विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांनी त्या बांधकामाची देखरेख करण्याकडे हेतुतः दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदार प्रियंका रोहित नावंदर यांचे फावले आणि त्यांनी मंजूर तपशील, तांत्रिक मानके आणि गुणवत्ता गुंडाळून ठेवून दर्जाहीन बांधकाम केले.
नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम नऊ महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक होते. परंतु नऊ महिन्यांची मुदत उलटून जाऊन तब्बल साडेतीन वर्षे लोटली तरीही कंत्राटदाराने हे बांधकाम पूर्ण केले नाही. या दरम्यान, नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम लवकर पूर्ण करा, असे एकच पत्र विद्यापीठ प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. त्यापलीकडे कार्यकारी अभियंता काळे यांनी हे या बांधकाम कामाच्या गुणवत्तेबाबत गेल्या साडेतीन वर्षात चकार शब्दही काढल्याचे कोणतेही अभिलेख उपलब्ध नाहीत.
विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता आर.डी. काळे यांच्या दिमतीला दोन उपअभियंते, दोन सहायक अभियंते आणि दोन कंत्राटी अभियंते एवढा मोठा कर्मचारी वर्ग असतानाही नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम दर्जाहीन झाले. यातून त्यांची मानसिकता आणि नामांतर लढ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही स्पष्ट होतो.
विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांनी कर्तव्यात गंभीर कसूर करत नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामाकडे हेतुतः दुर्लक्ष केल्यामुळेच नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामात गंभीर स्वरुपाच्या संरचनात्मक त्रुटी ठेवत प्रियंका रोहित नावंदर या कंत्राटदाराने गुणवत्तेचे सर्व निकष धाब्यावर बसवले. परिणामी दर्जाहीन नामांतर शहीद स्मारकाची उभारणी होऊन नामांतर चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरी समूहाच्या भावनांशीच खेळण्याचा प्रमाद घडला. त्यामुळे या दर्जाहीन बांधकामाला जबाबदार धरून कुलगुरू डॉ. विजय फुलारी हे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांच्याविरुद्ध कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचाः नगर परिषद व नगर पंचायतींच्या सेवाप्रवेश नियमांत होणार सुधारणा, २,९०० रिक्त पदे तातडीने भरणार
स्मारकाच्या बांधकामात ‘या’ गंभीर त्रुटी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, कंत्राटदार यांनी २९ जून २०२६ रोजी नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामाची संयुक्त पाहणी केली असता नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामाला कुठलाच दर्जा नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाहणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी अशाः
- मुख्य स्तंभ झुकलाः नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम पूर्ण होऊन या स्मारकाचे लोकार्पण होणे अद्याप बाकी असतानाच स्मारकाचा मुख्य स्तंभ झुकल्याचे या संयुक्त पाहणीत आढळून आले आहे. ही बाब संरचनात्मकदृष्ट्या गंभीर असून हा विद्यमान मुख्य स्तंभ पाडून आवश्यक संरचनात्माक रचना व पाया तपासून मुख्य स्तंभाचे पुनर्बांधकाम करण्याचे आदेश आता प्रियंका रोहित नावंदर या कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने २९ जून २०२६ रोजी दिले आहेत.
- फ्लोअरिंगला अनेक ठिकाणी तडेः नामांतर शहीद स्मारकाच्या हॉलमधील ग्रॅनाईट फ्लोअरिंग अनेक ठिकाणी तडे गेल्याचेही आढळून आले आहे. हे खराब ग्रॅनाईट काढून त्याऐवजी समान दर्जाचे ग्रॅनाईट बसवून फिनिशिंग दर्जेदार करावी, असेही कंत्राटदारास बजावण्यात आले आहे.
- स्लॅबला गळतीः स्मारकाच्या टॉयलेट ब्लॉकच्या वरील स्लॅबमधून पाणी झिरपत असल्याची धक्कादायक बाबही या संयुक्त पाहणीत आढळून आली आहे. आता विद्यमान वॉटर प्रुफिंग काढून टाकून आवश्यक दुरूस्तीसह स्लॅबची नव्याने वॉटर प्रुफिंग करावी आणि त्याची वॉटर पॉडिंग चाचणी घावी, असे कार्यकारी अभियंत्याने कंत्राटदाराला बजावले आहे.
