विद्यापीठातील नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, गंभीर संरचनात्मक त्रुटींमुळे लोकार्पण होण्याआधीच झुकला स्मारकाचा मुख्य स्तंभ!


छत्रपती संभाजीनगरः मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी झालेल्या ऐतिहासिक नामांतर लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात नामांतर योद्ध्यांच्या स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले असून स्मारकाच्या मुख्य स्तंभाच्या बांधकाम गंभीर स्वरुपाच्या संरचनात्मक त्रुटी असल्यामुळे हे स्मारक लोकार्पण होऊन खुले होण्याआधीच स्मारकाचा मुख्य स्तंभ झुकल्याची धक्कादायक बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानेच केलेल्या पाहणीत आढळून आली आहे. आता हा मुख्य स्तंभ पाडून तो नव्याने उभारण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’ असे नामांतर करा, या मागणीसाठी १९७७ ते १९९४ अशी तब्बल १७ वर्षे ऐतिहासिक नामांतर लढा चालला. अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी महाराष्ट्र सरकारने या विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार केला. हा नामांतर लढा केवळ एका विद्यापीठाचे नाव बदलण्यापुरता मर्यादित नव्हता, तर शोषित, वंचित आणि बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचा लढा होता. या नामांतराच्या कुरूक्षेत्रावर दलित अस्मितेची विजयी पताका फडकवण्यासाठी ज्ञात-अज्ञात दलित कार्यकर्ते व भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

नामांतर लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या या नामांतर योद्ध्यांच्या स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतर शहीद स्मारक उभारण्याची मागणी नामविस्तारापासूनच केली जात होती. ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठीही अनेकांना खस्ता खाव्या लागल्या. अखेर ही मागणी मान्य झाली. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या स्मारकासाठी २ कोटी २५ लाख २८ हजार ५२५ रुपये निधी मंजूर केला. निविदा प्रक्रियेअंती छत्रपती संभाजीनगर येथील प्रियंका रोहीत नावंदर या कंत्राटदाराला या स्मारकाचे कंत्राट देण्यात आले.

२०२३ मध्ये विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी नामांतर शहीद स्मारकाच्या उभारणीला सुरूवात झाली. ऐतिहासिक नामांतर लढ्याची आठवण म्हणून विद्यापीठ परिसरात नामांतर शहीद स्मारक उभा राहत आहे, ही बाब तमाम नामांतरवाद्यांना सुखावणारी होती. मात्र भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीच्या विळख्यातून नामांतर शहीद स्मारकाचे बांधकामही सुटू शकले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कंत्राटदाराने संगनमताने हडेलहप्पी केल्यामुळे तब्बल २ कोटी २५ लाख २८ हजार ५२५ रुपये खर्चून या स्मारकाचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे.

नामांतर शहीद स्मारकाचे काम अत्यंत संथगतीने त्याचबरोबर अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांकडे केली होती. शहीद स्मारकाच्या निष्कृष्ट व दर्जाहीन बांधकामाची चौकशी करून प्रियंका रोहित नावंदर या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणही केले होते. या निकृष्ट बांधकामाची आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी यांची संयुक्त पाहणी आयोजित करावी, अशीही त्यांची मागणी होती.

 सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, कंत्राटदार आणि व वडमारे यांनी शहीद स्मारकाच्या बांधकामाची संयुक्त पाहणी केली असता नामांतर शहीद स्मारकाच्या बांधकामाला कुठलाच दर्जा नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

स्मारकाच्या बांधकामात ‘या’ गंभीर त्रुटी

  • मुख्य स्तंभ झुकलाः नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम पूर्ण होऊन या स्मारकाचे लोकार्पण होणे अद्याप बाकी असतानाच स्मारकाचा मुख्य स्तंभ झुकल्याचे या संयुक्त पाहणीत आढळून आले आहे. ही बाब संरचनात्मकदृष्ट्या गंभीर असून हा विद्यमान मुख्य स्तंभ पाडून आवश्यक संरचनात्माक रचना व पाया तपासून मुख्य स्तंभाचे पुनर्बांधकाम करण्याचे आदेश आता प्रियंका रोहित नावंदर या कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने २९ जून २०२६ रोजी दिले आहेत.
  •  फ्लोअरिंगला अनेक ठिकाणी तडेः नामांतर शहीद स्मारकाच्या हॉलमधील ग्रॅनाईट फ्लोअरिंग अनेक ठिकाणी तडे गेल्याचेही आढळून आले आहे. हे खराब ग्रॅनाईट काढून त्याऐवजी समान दर्जाचे ग्रॅनाईट बसवून फिनिशिंग दर्जेदार करावी, असेही कंत्राटदारास बजावण्यात आले आहे.
  • स्लॅबला गळतीः स्मारकाच्या टॉयलेट ब्लॉकच्या वरील स्लॅबमधून पाणी झिरपत असल्याची धक्कादायक बाबही या संयुक्त पाहणीत आढळून आली आहे. आता विद्यमान वॉटर प्रुफिंग काढून टाकून आवश्यक दुरूस्तीसह स्लॅबची नव्याने वॉटर प्रुफिंग करावी आणि त्याची वॉटर पॉडिंग चाचणी घावी, असे कार्यकारी अभियंत्याने कंत्राटदाराला बजावले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येत असलेले नामांतर शहीद स्मारक दर्जाहीन असून गंभीर स्वरुपाच्या संरचनात्मक त्रुटींमुळे स्मारकाचा मुख्य गाभा असलेला स्तंभच झुकल्याचे कार्यकारी अभियंत्याच्याच पाहणीत आढळून आले आहे.

अनेक कामे अपूर्ण, तरीही भरला कंत्राटदाराचा खिसा

या स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार, लॉन्स, पार्किंग टाईल्स, रॅम्प रंगरंगोटी ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. स्मारकाच्या परिसरात बांधकामाचा मलबा, अनावश्यक  साहित्य  व कचरा साचलेला आहे. प्रियंका रोहित नावंदर हा कंत्राटदार करत असलेले नामांतर शहीद स्मारकाचे बांधकाम कसे होत आहे? मंजूर तपशील व मानकानुसार काम केले जात आहे की नाही? याची खातरजमा न करताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंत्राटदाराला नियमित देयके अदा केली.  या कंत्राटदाराला आजवर एकूण १ कोटी ९५ लाख ५२ हजार ८५० रुपये अदा करण्यात आले. आता नुकचे २१ जानेवारी २०२६ रोजी २१ लाख ८४ हजार ४०५ रुपयांचे देयक अदा करण्यात आले आणि महत्वाची कामे अपूर्ण असतनाही हे स्मारक वापरात आणले जात असल्याचा (Building is Put To Use) शेरा देत उपयोगिता प्रमाणपत्रही देण्यात आले.

कंत्राटदाराकडून ‘सेटिंग’चा प्रयत्न?

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, कंत्राटदार आणि व वडमारे यांनी २९ जून रोजी शहीद स्मारकाच्या बांधकामाची संयुक्त पाहणी केल्यानंतर त्याच दिवशी कंत्राटदाराला पत्र देऊन १५ दिवसांत तांत्रिक मानके, मंजूर तपशील व गुणवत्तेनुसार पाडकाम, पुनर्बांधकाम व दुरूस्तीची कामे करण्याचे फर्मान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने प्रियंका रोहित नावंदर या कंत्राटदाराला बजावले होते. परंतु १३ जुलैपर्यंत या कंत्राटदाराने कार्यकारी अभियंत्याच्या आदेशाचे अनुपालन करण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाही. काल १४ जुलै रोजी या कंत्राटदाराने थातुरमातूर डागडुजी करून धुळफेक करण्याचा प्रयत्न केला. झुकलेला मुख्य स्तंभ पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही पंधरा दिवस उलटले तरी या कंत्राटदाराने त्या दृष्टिने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे मुख्य स्तंभाचे पुनर्बांधकाम टाळण्यासाठी कंत्राटदार सेटिंगच्या प्रयत्नात असल्याचा आरोप वडमारे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!