तमीळ अभिनेत्री, भाजप नेत्या नमिता यांना मदुराईच्या मंदिरात प्रवेशासाठी मागितला हिंदू असल्याचा पुरावा


मदुराईः तामीळनाडू भाजप राज्य कार्यकारिणीच्या सदस्या आणि अभिनेत्री नमिता यांना मदुराईतील मीनाक्षी सुंदरेश्वरी मंदिरात प्रवेशासाठी हिंदू असल्याचा पुरावा मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नमिता या सोमवारी पतीसह या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तेव्हा मंदिर प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला आणि हिंदू असल्याचा पुरावा मागितला, असा आरोप नमिता यांनी केला आहे.

मी हिंदू म्हणूनच जन्माला आली आहे आणि माझे लग्न तिरूपती येथे झाले होते, हे सर्वांनाच माहिती आहे. माझ्या मुलाचे नावही भगवान श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवले आहे. तरीही मंदिरातील अधिकारी आमच्याशी उद्धटपणे आणि अहंकाराने वागले. त्यांनी माझी जात आणि श्रद्धा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा मागितला, असे नमिता म्हणाल्या.

मला माझ्या स्वतःच्या देशात आणि माझ्या स्वतःच्या राज्यात पहिल्यांदाच परके असल्याची भावना दिसून आली. मी हिंदू आहे, याचा मला पुरावा द्यावा लागला. माझ्याकडे पुरावा मागण्यात आला, याचे मला वाईट वाटले नाही, परंतु मंदिरातील अधिकाऱ्यांनी ज्या उद्धटपणे आणि अहंकाराने पुरावा मागितला, त्याचे सर्वात वाईट वाटले, असे नमिता यांनी म्हटले आहे.

नमिता यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून त्यांच्याबाबत घडलेला हा धक्कादायक प्रकार सविस्तर सांगितला आहे. माझा मदुराई दौरा आध्यात्मिक होता आणि इस्कॉनमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी गेले होते. विचारपूस करण्याची एक पद्धत असते. मला एका कोपऱ्यात २० मिनिटे उभे करण्यात आले. आम्ही रविवारीच आमच्या दौऱ्याबद्दल स्थानिक पोलिसांना माहिती दिली होती. आमच्या येण्यामुळे इतर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही मास्क घातला होता, असे नमिता यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. मंदिर प्रशासनातील उद्धट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी तामिळनाडूचे धर्मादाय मंत्री पी. के. शेखर बाबू यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, मंदिर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, नमिता आणि त्यांचे पती मास्क परिधान करून मंदिरात प्रवेश करत होते. त्यामुळे ते हिंदू आहेत का, याची चौकशी करण्यात आली आणि त्यांना मंदिरातील परंपरांची माहिती देण्यात आली. त्या हिंदू असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या कपाळी गंध लावून त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. परंतु नमिता यांनी अधिकाऱ्याचे हे स्पष्टीकरण फेटाळून लावले आहे. मी हिंदू असल्याचा पुरावा दिल्यानंतर आणि कपाळावर गंध लावल्यानंतरच मला मंदिरात प्रवेश देण्यात आला, असे नमिता यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *