बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


नवी दिल्लीः  आपल्याच महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसाराम बापू जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ८५ वर्षीय आसाराम बापूला ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु या काळात त्यांना आपल्या अनुयायांना भेटता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे.

आसाराम बापूला ह्रदयाशी संबंधित आजार आहे. जोधपूरच्या हेल्थ मेडिकल सेंटरमध्ये आसाराम बापूवर उपचार सुरू आहेत. अंतरिम जामीनाच्या काळात आसाराम बापूवर देखरेख ठेवण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

आसुमल हरपलानी उर्फ आसाराम बापूवर २०१३ जोधपूर आणि गांधीनगरमध्ये बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले होते. एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी फेब्रुवारी २०२३ मध्ये गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूला झालेली ही दुसरी शिक्षा होती. यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला दोषी ठरवण्यात आले होते.

बलात्काराचे गुन्हे दाखल होण्यापूर्वी आसाराम बापू लोकप्रिय धर्मगुरू होता. त्याच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात होती. राजकीय वर्तुळातही आसाराम बापूचे अनेक अनुयायी होते. आसाराम बापू लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्याच्या सोबत दिसलेल्या राजकीय नेत्यांमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी, माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण आडवाणी, काँग्रेस नेते कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांचा समावेश होता.

१९७० च्या दशकात आसाराम बापूने अहमदाबादेत साबरमती नदीच्या काठावर पहिला आश्रम सुरू केला होता. त्यानंतर देशभरात त्याने कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते. त्याच्या आश्रमातील विविध उत्पादने आणि आध्यात्मिक साहित्य देशभरात मोठ्या प्रमाणात विकले जात होते. बलात्कार प्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यामुळे आसाराम बापू नावाच्या शक्तिशाली व्यक्तीचा अस्तच झाला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!