‘सनातन धर्म’ हाच भारताचा राष्ट्रीय धर्मः योगी आदित्यनाथ यांची घोषणा; तर मग जैन, बौद्ध, इस्लाम संपले का?-काँग्रेसचा सवाल


नवी दिल्ली/लखनऊः ‘सनातन धर्म’ हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आणि राम मंदिर हेच भारताचे राष्ट्रीय मंदिर आहे, अशी घोषणाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करून टाकली आहे. भारतीय संविधानाच्या मूळ भावनेलाच हात घालणारी योगी आदित्यनाथ यांची ही घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) हिंदू राष्ट्राच्या स्वप्नाची अप्रत्यक्ष घोषणाच असल्याचे मानले जात आहे. योगींच्या या घोषणेवर देशभरातून तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

 राजस्थानच्या जालोर येथील नीलकंठ महादेव मंदिराच्या वतीने शुक्रवारी (२७ जानेवारी) आयोजित एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे. वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन आम्ही राष्ट्रीय धर्माशी जोडले जातो. जर आम्ही राष्ट्रीय धर्माशी जोडलो गेलो तरच देश सुरक्षित होता. आमची धार्मिक स्थळे तोडली गेली तर त्यांची पुनर्बांधणीही होते. अयोध्येत ५०० वर्षांनंतर राम मंदिराचे निर्माण केले जात आहे. भव्य मंदिर उभारले जात आहे. आज भारताचे राष्ट्रीय मंदिर भगवान रामाच्या मंदिराच्या रूपाने स्थापित होत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

“आमचा सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे. आपण सगळे वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन या राष्ट्रीय धर्माशी जोडले जातो. आपला देश सुरक्षित रहावा, आमच्या गो ब्राह्मणांचे रक्षण व्हावे, एखाद्या कालखंडात आपल्या धार्मिक स्थळांना अपवित्र केले गेले असेल, तर त्यांच्या पुनर्स्थापनेचे अभियान चालावे. या अभियानाचा क्रम तुम्ही पहात असाल की, अयोध्येत ५०० वर्षानंतर प्रधानमंत्री नोदींच्या प्रयत्नांमुळे भगवान रामाच्या भव्य मंदिराचे काम पूर्ण होऊ घातले आहे. आज भारताचे राष्ट्रीय मंदिर भगवान रामाच्या मंदिराच्या रूपाने स्थापित होत आहे.”

योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ यांच्या  या घोषणेवर काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी सवाल केले आहेत. आमचा सनातन धर्म भारताचा राष्ट्रीय धर्म. याचाच अर्थ शीख, जैन, बौद्ध निरंकार, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म संपुष्टात, असे ट्विट डॉ. उदित राज यांनी केले आहे. ‘सनातन धर्मात महिला, दलित व मागासवर्गाचे स्थान कुठे आहे, हे तर आधी सांगा. नंतर पुढचे बोलू,’ असेही उदित राज यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते डॉ. स्वामीप्रसाद मौर्य यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. ‘धर्माच्या आड लपलेल्या लांडग्यांपासून सावध राहण्याची गरज आहे,’ असे स्वामीप्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.

योगींची घोषणा भारतीय संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ही घोषणा भारतीय संविधानाच्या मूळ भावनेच्याच विरोधात आहे. भारताचे संविधान कोणत्याही एका धर्माचा स्वीकार करत नाही. ते बहुभाषा, संस्कृती, अनेक धर्माचा समावेश असलेल्या भारताला रेखांकित करते. भारतीय संविधान धर्मनिरपेक्षता सांगते. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदावर असलेले योगी आदित्यनाथ सनातन धर्म सांगत आहेत आणि स्वतःच हा सनातन धर्म राष्ट्रीय धर्म असल्याचे जाहीर करत आहेत. ज्या संविधानाची शपथ घेऊन योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले, त्याच संविधानाच्या मूळ भावनेला छेद देण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.

“काल काही परिचित बौद्ध धर्माच्या सहकाऱ्यांचे फोन आले की, सनातन धर्म जर राष्ट्रीय धर्म आहे, तर आमच्या धर्माचे काय होईल? सनातन धर्माच्या अस्तित्वाला कोण नाकारू शकतो? मी विचार केला की, योगीजींनाच विचारले पाहिजे की, अन्य धर्म आहेत की नाहीत? की केवळ एवढाच आहे. बौद्धीक चर्चा चर झालीच पाहिजे.”

डॉ. उदित राज, काँग्रेस नेते.

योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेचे अनेक अर्थ आहेत. आता योगी आदित्यनाथ यांनी असे वक्तव्य केले आहे. नंतर भाजपचे इतर नेते ‘हिम्मत असेल तर योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा विरोध करा,’ असे आव्हान काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांना देतील. निवडणुकींच्या वर्षात हिंदुत्वाच्या आसपासच सर्व चर्चा फिरती राहिली पाहिजे, अशीच भाजपची एकूण रणनीती दिसू लागली आहे.

‘धोरणात्मक’ जुमलेबाजी करून ‘मतांची शेती’ कसण्याचा प्रयत्न

 योगी आदित्यनाथ यांचे ही घोषणा ‘धोरणात्मक’ असून या वर्षी ९ राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशीच ‘धोरणात्मक’ घोषणा आणि वक्तव्यांच्या जुमलेबाजीच्या बळावर आपली राजकीय मांड पक्की करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसू लागला आहे. ज्या राजस्थानमध्ये योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले तेथे याच वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पुढील दहा महिन्यांत राजस्थान विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजेल. राजस्थानमध्ये भाजप सत्तेत राहिली आहे. परंतु काँग्रेसने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. त्यामुळे राजस्थानातील हिंदू मतांना चुचकारण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानमध्ये जाऊन असे वक्तव्य केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!