धावत्या जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेत आरपीएफ जवानाचा गोळीबार, ४ जणांचा मृत्यू


मुंबईः जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आज सोमवारी पहाटे पाच वाजता गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रेल्वे पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गोळीबार करून आरपीएफ जवान चालत्या गाडीतून उडी मारून फरार झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आणण्यात आली असून पोलिसांना पुढील तपास सुरू केला आहे.

गाडी क्रमांक १२९५६ जयपूर-मुंबई ही सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. या रेल्वेत सुरक्षेसाठी तैनात असलेला आरपीएफ जवान चेतनकुमार सिंह याने बोगी क्रमांक बी-५ मध्ये आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला. या गोळीबारात रेल्वे पोलिस दलातील सहायक निरीक्षक टिकाराम यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर चेतनकुमार सिंह हा दहिसर रेल्वेस्थानकाजवळ चालत्या रेल्वेतून उडी मारून फरार झाला. मात्र रेल्वे पोलिसांनी चेतनकुमार सिंहला भाईंदरमधून रिव्हॉल्वरसह अटक केली आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

आरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची माहिती आम्हाला सकाळी ६ वाजता मिळाली. या घटनेनंतर आमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

गोळीबार झाला तेव्हा जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक बी-५ मध्ये अनेक प्रवाशी होते. या बोगीतील एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी घडलेला प्रसंग प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बोगीत गोळीबाराचा आवाज आला. मी एसी कोचच्या दिशेने गेलो तेव्हा मृतदेह खाली पडलेले होते. आरपीएफ जवानाच्या हातात रिव्हॉल्वर होती आणि तो बोगीत फिरत होता. सहायक निरीक्षक टिकाराम खाली पडलेले होते. त्या आरपीएफ जवनाने इतर प्रवाशांवरही गोळ्या झाल्या होत्या. या प्रकारामुळे बोगीतील इतर प्रवाशी प्रचंड घाबरलेले होते.

या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदीवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मानसिक तणावातून या आरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात गोळीबार झालेल्या बोगी क्रमांक बी-५ ची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.


1 Comment

  • गूलदाद पठाण ,

    भाऊ साहेब जी.
    हा भिडू. भिडे.. ?
    भाजपचे कोणीच लागत नाही. असे उप मू, म्हणाले…. !
    तरी पण या भिडू ला पोलिस संरक्षण आहे .‌‌!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *