छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालगत असलेल्या बुद्ध लेणीच्या पायथ्याशी मागील ६० ते ७० वर्षांपासून असलेले विपश्यना बुद्ध विहार व भिक्खू कुटीला अतिक्रमण ठरवून बेगमपुरा पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली असून उद्या सोमवारी (७ ऑक्टोबर) अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात बुद्ध लेणी बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भिक्खू संघ आणि बौद्ध उपासकांनी वस्त्या-वस्त्यांत जाऊन या महामोर्चाबद्दल माहिती देऊन जनजागृती केल्यामुळे या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध उपासक सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुटी जाहीर करण्यात आली आहे.
या बुद्ध लेणी बचाव महामोर्चात सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना गट-तट विसरून सहभागी होणार असल्याने हा महामोर्चा ऐतिहासिक होईल. किमान दोन लाख उपासक या महामोर्चात सहभागी होतील, असा विश्वास भिक्खू संघाने व्यक्त केला आहे. बुद्ध लेणी परिसर हा ऑक्सिजन हब असल्याने निसर्गप्रेमींनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
क्रांतीचौक येथून या महामोर्चाला सुरूवात होईल. पैठण गेट, टिळक पथ, गुलमंडी, सिटीचौक, शहागंज येथील गांधी पुतळा, हर्ष नगरमार्गे हा महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकेल. तेथे विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन सभेद्वारे मोर्चाचे विसर्जन होईल. भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर हे या महामोर्चाचे नेतृत्व करणार असून महाराष्ट्र भरातील बौद्ध भिक्खू या महामोर्चात सहभागी होणार असल्याचे भन्ते संघप्रिय यांनी सांगितले.
या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर भिक्खू संघ आणि बौद्ध उपासकांनी गेल्या आठवडाभरापासून वस्त्या-वस्त्यांत जाऊन जनजागृती केली आणि या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपासकांना केले आहे. सोशल मीडियावरही या महामोर्चाचे मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनिंग करण्यात आले आहे. त्यामुळे हा महामोर्चा ऐतिहासिक होईल आणि लाखोंच्या संख्येने उपासक या महामोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील बुद्ध लेण्यांच्या सोबतच पायथ्याशी असलेल्या विपश्यना बुद्ध विहार येथे मागील ६० ते ७० वर्षांपासून बौद्ध अनुयायी श्रद्धेने नतमस्तक होतात. लेण्यांच्या निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य राहिले असल्याने अनेक श्रद्धावान उपासक, लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून, सहभागातून बौद्ध विहार, भिक्खू कुटी, सभा मंडप व विविध सुविधांनी परिसराचा विकास करण्यात आला आहे.
मूळात हजारो वर्षापासून बुद्ध लेणी असताना पायथ्याच्या जागेची मालकी विद्यापीठाची कशी असेल?, असा प्रश्न उपस्थित करत जागेच्या मालकीची शहानिशा न करताच बौद्धांचे ऐतिहासिक स्थळ हटवण्यामागे मनुवादी सरकारचे कटकारस्थान असल्याचा आरोप मोर्चाच्या आयोजकांनी केला आहे.
महामोर्चाच्या प्रमुख मागण्या
- बुद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा देण्यात यावी.
- बुद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा.
- बुद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा.
- बुद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणीच्या धर्तीवर प्रकाशयोजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी.
- ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील हर्सूल टी पॉईंट येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी.
- अजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे.
- महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेण्यावरील इतर धर्मीयांची अतिक्रमणे तत्काळ हटविण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्या सर्व बुद्ध लेण्यांचा बुद्धिस्ट सर्किट व तीर्थक्षेत्र- पर्यटन स्थळात समावेश करावा.
या महामोर्चाच्या यशस्वीतेसाठी भन्ते नागसेन बोधी महाथेरो, भंते संघप्रिय, भंते बोधीधम्म, भंते उपाली भंते निर्वाण, भंते आनंद, प्रकाश निकाळजे, दौलत खरात, रमेशभाई खंडागळे, गौतम लांडगे, संजय जगताप, गौतम खरात, किशोर थोरात, अरुण बोर्डे, बंडू कांबळे, जालिंदर शेंडगे, दिपक निकाळजे, सचिन निकम, आनंद कस्तुरे, गुल्लू वाकेकर, विजय वाहुळ, अमित वाहुळ, मुकेश खोतकर, विजय शिंदे, सचिन जोगदंडे, सोनू नरवडे, कपिल बनकर, संतोष चव्हाण, नागेश जावळे, दत्ता जाधव, नागेश केदारे, आनंद बोर्डे, मेघानंद जाधव, गंगा पाईकराव, मिलिंद दाभाडे, गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे, अमर हिवराळे, पूनम गंगावणे, राहुल अंकुशे, आशिष मनोरे, मुकुंद जंजाळे, हरीश खेडकर, कमलेश नरवडे, सुरेश मगरे, विजय शिंगारे, अनामी मोरे, सचिन बनसोडे, राष्ट्रपाल गवई, संदीप वाहुळ, नितीन निकाळजे आदी परिश्रम घेत आहेत.
सोमवारी विद्यापीठाला सुटी जाहीर
बुद्ध लेणी बचाव महामोर्चात लाखोंच्या संख्येने उपासकांचा सहभाग आणि या महामोर्चानंतर हा जमाव बुद्ध लेणी परिसरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सोमवारी (७ ऑक्टोबर) सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग बंद राहणार आहेत. २२ ते २४ ऑक्टोबरदरम्यान नॅक समिती विद्यापीठात मूल्यांकनासाठी येणार असल्यामुळे १३ ऑक्टोबर आणि २० ऑक्टोबर या दोन्ही रविवारी विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग नियमितपणे सुरू राहणार आहेत, असे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कळवले आहे.