मुंबईः महाराष्ट्र विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत झालेले मतदान आणि मोजलेले मतदान याच्यात मोठे अंतर असल्याची धक्कादायक बाब डेटा विश्लेषणातून समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात ६४,८८, १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही अंतिम टक्केवारी ६६.०५ टक्के आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या वेळी मोजलेल्या मतांची संख्या ६४,५९२,५०८ एवढी आहे. म्हणजेच झालेल्या एकूण मतदानापेक्षा मोजलेल्या एकूण मतदानाचा आकडा तब्बल ५,०४,३१३ मतांनी जास्तीचा आहे. एवढ्या मोठे संख्येने ही ‘अतिरिक्त’ मते आली कुठून? असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात आली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ६४,०८८,१९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ३०,६४९,३१८ महिला मतदार तर ३३,४३७,०५७ पुरूष मतदार आणि १८२० अन्य मतदारांचा समावेश आहे. मतदानाची ही टक्केवारी ६६.०५ टक्के इतकी आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मोजलेल्या मतांची संख्या ६४,५९२,५०८ आहे. म्हणजेच महाराष्ट्रभरात प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात तब्बल ५,०४,३१३ मतांचा मोठा फरक आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपलब्ध झालेल्या डेटाचे विश्लेषण केले असता महाराष्ट्रातील २८८ पैकी ८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानापेक्षा मोजलेली मते कमी आली आहेत तर उर्वरित २८० विधानसभा मतदारसंघांत झालेल्या मतदानापेक्षा मोजलेल्या मतांची संख्या जास्त आली आहे.
झालेले मतदान आणि मोजलेल्या मतदानातील सर्वात मोठी विसंगती आष्टी विधानसभा मतदारसंघात आढळून आली आहे. आष्टी मतदारसंघात झालेल्या मतदानापेक्षा ४,५३८ मते जास्तीची मोजण्यात आली आहेत. म्हणजे जेवढी मते पडली नाहीत, त्यापेक्षा जास्त मते मोजण्यात आली आहेत. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातही झालेले मतदान आणि मोजलेल्या मतदानात ४,१५५ मतांचा फरक आहे.
काही उदाहरणे पाहू. नवापूर विधानसभा मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या २,९५,७८६ आहे. त्यापैकी २० नोव्हेंबर रोजी २,४०,०२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची ही टक्केवारी ८१.१५ टक्के आहे. परंतु निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतमोजणीच्या निकालात एकूण २,४१,१९३ मते मोजण्यात आली. म्हणजेच झालेल्या मतदानापेक्षा मोजलेली मते १,१७१ ने जास्त आहेत.
विशेष म्हणजे नवापूर मतदारसंघात विजयी आणि पराभूत उमेदवाराला पडलेल्या मताचे अंतर केवळ १,१२२ आहे म्हणजेच विजयी झालेल्या उमेदवाराचे मताधिक्य केवळ १,१२२ आहे आणि मोजलेल्या जास्तीच्या मतांची संख्या १,१७१ आहे. म्हणजेच ही जी जास्तीची मते आहेत, ती मते या विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर संशय घेण्यास पुष्टी देणारी आहेत.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात ६०.५८ टक्के मतदारांनी म्हणजेच एकूण २४६६३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या दिवशी मात्र मोजलेल्या ईव्हीएम मतांची संख्या २४५९८९ आढळून आली आहे. म्हणजेच प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा ६४९ मते कमी मोजण्यात आली आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र झालेल्या मतदानापेक्ष कमी मते मोजण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या ३,८६,१७२ आहे. या मतदारसंघात ७२.५९ टक्के मतदारांनी म्हणजेच २,८०,३१९ मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावला. परंतु २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एकूण २,७९,०८१ मते मोजण्यात आली. मोजलेली ही मते प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा १,२३८ मतांनी कमी आहेत.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) पावत्यांची आकडेमोड करताना कारकुनांच्या चुका, डेटा एंट्री किंवा तांत्रिक बिघाडासह विभिन्न कारणांनी झालेले मतदान आणि मोजलेल्या मतदानाच्या संख्येत विसंती येऊ शकते. परंतु पारदर्शकतेसाठी भक्कम ऑडिटिंगची यंत्रणा का उभारली जात नाही? हाही मोठाच प्रश्न आहे.
एकंदर प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजलेले मतदान याच्यात सरासरी १७५१ मतांची तफावत आहे. ज्याचे सरासरी मूल्य जवळवास १,७१० मते इतके आहे. या विसंगतींमधील मानक विचलन अंदाजे ९५६ मते आहे, हे मानक विचलन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील आकड्याच्या तफावतील आकारात लक्षणीय फरक दर्शवते. ते या तफावती भोवतालच्या परिस्थितीचे काळजीपूर्वक परीक्षण करण्याची गरज अधोरेखित करतो.
मतांचाच्या तफावतीतील काही उदाहरणे
मुखेड- ३१५३, लोहा- ३०५४, देगलूर- २९२२, नायगाव- २४६२, गंगाखेड- ३६३२, परळी-२१६७, माजलगाव- २१०७, केज- २८७८, लातूर ग्रामीण-१५००, परांडा- २७४०, आष्टी- ४५३८, बार्शी- ३३३२, फलटण- ३१९५, भोकर- १९८४, गेवराई- १९९८.