अमरावती/मुंबईः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली असून भिडेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने केली जात असतानाच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंच्या बाबत मोठा दावा केला आहे. संभाजी भिडे हे अफजल खानाच्या वकिलांचे वंशज असल्याचा दावा केला आहे.
हा माणूस इतका घाणेरडा आहे. संभाजी भिडे (मनोहर कुलकर्णी) ज्या भागातून येतात तेथे फोन लावला आणि हा माणूस कसा आहे असे विचारले. तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितले की, संभाजी भिडे अफजल खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचे वंशज आहेत. म्हणजे हे वंशज कोणाचे, नाव काय ठेवतात, बोलतात काय? दुसरीकडे सरकार त्यांना खुलेपणाने फिरू देत आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
पंडित नेहरूंचे देशासाठी नखाइतकेही योगदान नाही, असे संभाजी भिडे म्हणतात. मग यांनी योगदान दिले आहे का? नेहरू देशासाठी ११ वर्षे तुरुंगात होते. ११ वर्षे तुरुंगात असलेल्या व्यक्तिला हे असे कसे बोलू शकतात? ते युवकांची डोकं खराब करत आहेत. युवकांची पिढी खराब करण्याचे यांचे षडयंत्र आहे, हे आम्ही होऊ देणार नाही, असे ठाकूर म्हणाल्या.
हे लोक निर्लज्जासारखे वागत आहेत. पोलिसांनी संभाजी भिडेंवर कारवाई केली पाहिजे. त्यांना अटक का होत नाही? त्यांनी काहीही बरळायचे, महात्मा गांधी, महात्मा फुलेंची अपमान करायचा. साई बाबांना काहीतरी बोलायचे, पंडित नेहरूंबद्दल काही तरी बोलायचे आणि हे काय दुधाने धुतले आहेत का? असा सवाल ठाकूर यांनी केला.
संभाजी भिडेंवर गुन्हे दाखल करा म्हणून आग्रह धरला तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. संभाजी भिडेंवर सगळीकडे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल झाले पाहिजे. देशाच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे असेच करत राहिले आणि समाजात अशांतता पसरवली, १५ ऑगस्टच्या काळात काही अनर्थ झाला तर याला जबाबदार गृह खाते, पोलिस आणि नालायक संभाजी भिडे असेल, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
ठाकूर यांच्यावर कारवाई कराः भाजप,शिवप्रतिष्ठानची मागणी
राष्ट्पिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून ठिकठिकाणी निषेध आंदोलने केली जात आहेत. अमरावती येथील काँग्रेसच्या आंदोलनात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हरामखोर या शब्दाचा वापर केला. त्या शब्दावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह कोतवाली पोलिस ठाण्याला घेराव घालून यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनीही ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.