साताराः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे एरवी शांत व संयमी दिसणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत भिडेंच्या अटकेची मागणी केली. या मागणीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना आज फोनद्वारे आणि ईमेलद्वारे अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सातारा पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत.
संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती.
संभाजी भिडेंनी भारताच्या राष्ट्रपित्याबद्दल निंदापूर्वक व्यक्तव्य केले आहे. अशाप्रकारे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कलम १५३ अन्वये अटक केली गेली पाहिजे. हा माणूस हे काम आज करत नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम तो करत आहे, असे पृथ्वीराज चव्हाण पावसाळी अधिवेशनात म्हणाले होते.
आता त्यांच्या या वक्तव्याची त्वरित दखल घेण्यात यावी. जर संभाजी भिडे हा व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल अशाप्रकारचे विधान करत असेल तर तो बाहेर कसा फिरू शकतो? असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विधानसभेत विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज अज्ञात व्यक्तीकडून त्यांना फोनद्वारे आणि ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर त्यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी कराड पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. चव्हाण यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काय म्हणाले होते भिडे?
मोहनदास हे चारित्र्य संपन्न व शिलवान करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते, त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या त्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले आणि तिच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला, असे भिडे यांनी गुरूवारी एका जाहीर सभेत केले होते.