सारस्वत बँकेला २३ लाख रुपयांचा दंड, रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?


मुंबईः  स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वातील मोठ्या बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कोट्यवधींचा दंड ठोठावल्यानंतर आता सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, बसेन कॅथॉलिक सहकारी बँक लिमिटेड आणि राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड या तीन बँकांनाही आरबीआयने दंड ठोठावला आहे. सारस्वत सहकारी बँकेला आरबीआयने तब्बल २३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक ही देशातील बँकांचे नियम करते. बँकांनी नियमांचे काटेकोर पालन केले नाही तर रिझर्व्ह बँकेककडून अशा बँकांना वेळोवेळी दंड आकारणी केली जाते. आरबीआयच्या या दंड आकारणीचा मोठा फटका एसबीआय या सार्वजनिक क्षेत्रात सर्वात मोठ्या बँकेला नुकताच बसला होता. आता तीन सहकारी बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे.

सारस्वत सहकारी बँकेने बँकिंग नियमन (बीआर ऍक्ट) कायद्यातील तरतुदी आणि त्याअंतर्गत आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने सारस्वत सहकारी बँक लिमिटेडला २३ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

 जेव्हा कर्ज घेणाऱ्या कंपनीला मंजूर करण्यात आलेल्या क्रेडिट सुविधेचे नुतनीकरण करण्यात आले, तेव्हा बँकेचे संचालकच कर्ज घेणाऱ्या कंपनीत स्वतंत्र संचालकपदावर कार्यरत होते. त्यामुळे आरबीआयकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आरबीआयने ठेवीवरील व्याजदरांबाबत जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेडला आरबीआयने १३ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. वसई येथील बसेन कॅथॉलिक सहकारी बँकेलाही आरबीआयने २५ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. बसेन बँक तिच्या मालकीच्या एका संचालक/फर्मला अनेक असुरक्षित कर्जे दिल्याबद्दल दोषी आढळल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ग्राहकांवर काय परिणाम?

भारतीय रिझर्व्ह बँक नियमांचे पालन न केल्यामुळे बँकांवर वेळोवेळी दंड आकरणी करत असते. मात्र त्याचा बँकेच्या खातेदारांवर कोणताही थेट परिणाम होत नसतो. बँक खातेदारांच्या रोख रक्कम काढण्यावर किंवा जमा करण्यावर यामुळे कोणतेही निर्बंध येत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही केवळ दंडात्मक कारवाई असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने एसबीआयला १.३ कोटा रुपये दंड ठोठावला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!