लातूरः नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या चौघांपैकी तीन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.
नांदेड एटीएसच्या पथकाने शनिवारपासून लातूरमध्ये सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. एटीएसच्या पथकाने लातूरमधील जिल्हा परिषद शाळेच्या दोन शिक्षकांची चौकशी केली. चौकशी करून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या शिक्षकांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडे १२ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे या पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर जिल्ह्यात शनिवारपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. शनिवारी सकाळीच नांदेडच्या एटीएसचे पथक लातूरमध्ये दाखल झाले. या पथकाने सर्व ऑपरेशन राबवत माहिती घेतली, तपास केला. लातूर पोलिसही सक्रीय झाले आहेत.
संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखान पठाण या दोन शिक्षकांवर पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही शिक्षकांचा नीट पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहेत.
लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवाशी असून ते सोलापूर जिल्ह्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात वास्तव्यास असलेले जलील उमरखान पठाण हे लातूर तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत.
चौकशीदरम्यान पोलिसांनी जलीलचा मोबाइल तपासला असता त्याच्या फोटो गॅलरीमध्ये १२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राच्या प्रती आढळून आल्या आहेत. परीक्षा आणि उमेदवारांसदर्भात अनेक व्हॉट्सअप चॅटही आढळून आले आहेत. जलील पठाण याने संजय जाधव याच्याकडे उमेदवारांच्या प्रवेशपत्राच्या काही प्रती आणि आर्थिक व्यवहारासंबंधित व्हॉट्सअपव्दारे मेसेज पाठवल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.
संजय जाधव याने पैशाच्या मोबदल्यात नीट परीक्षा पास करून देण्याचे आश्वासन देऊन अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरन्ना मस्नाजी कोनगलवार याला व्हॉट्सअपद्वारे पाठवल्याचे कबूल केले. इरन्ना मस्नाजी कोनगलवार हा मूळचा देगलूरचा रहिवाशी असून सध्या तो उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय येथे वास्तव्यास आहे.
इरन्ना कोनगलवार हा दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे. त्याच्या माध्यमातून पैशाच्या मोबदल्यात नीट-२०२४ परीक्षा उत्तीर्ण करून देण्याचे आश्वासन इरन्नाने दिल्याचे संजय जाधव यांनी चौकशीत सांगितले.
प्राथमिक चौकशीत हे चौघेही दोषी आढळून येताच दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय तुकाराम जाधव, जलीलखान उमरखान पठाण, इरन्ना मस्नाजी कोनगलवार आणि गंगाधर या चौघांच्या विरोधात भादंविच्या कलम ४२० आणि १२० (बी) तसेच केंद्र सरकारने पेपरफुटी प्रकरणी केलेला नवा कायदा सार्वजनिक परीक्षा (अनुचित व्यवहार प्रतिबंध) अधिनियम २०२४ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.