दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्राला सात राष्ट्रीय पुरस्कार, औरंगाबादची संस्थाही मानकरी

मुंबई: दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन २०२१ व २०२२ या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते.

सन २०२१ साठी अशोक तुकाराम भोईर, ठाणे (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), श्रीमती विमल पोपट गव्हाणे, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), डॉ. शुभम रामनारायण धूत, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), जिल्हा परिषद, अकोला (दिव्यांग अधिकार कायदा/ वैश्विक ओळखपत्र प्रणाली तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा) यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सन २०२२ मध्ये जयसिंग कृष्णाराव चव्हाण, नागपूर (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती) महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद (दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्था), दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे ( सुगम्य भारत अभियानाची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य) यांना हे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते दि. ३ डिसेंबररोजी नवी दिल्ली येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती दिव्यांग आयुक्तालय पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!