हिमायतनगरः ‘डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है..लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है….’ हा मूळ डायलॉग आहे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या १९७८ मध्ये रिलिज झालेल्या ‘डॉन’ सिनेमातील. त्यानंतर २००६ मध्ये याच ‘डॉन’ सिनेमाचा रिमेक आला आणि अभिनेता शाहरूख खानने उच्चारलेला हाच डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला. काडतुसे नसलेल्या रिकाम्या पिस्तुलाचा धाक दाखवून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहिसलामत निसटणारा ‘डॉन’ आपण या सिनेमात पाहिला. परंतु अख्खे पोलिस ठाणेच एखाद्या डॉनच्या इशाऱ्यावर चालते…. कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला कोणते बीट द्यायचे? कोणाचे अवैध अंधे सुरू ठेवायचे आणि कोणाचे अवैध धंदे बंद करायचे? कुणाकडून किती हप्ते वसूल करायचे? याबाबतचा ‘हुकुम’ एखादा डॉन पोलीस ठाणे प्रमुखाला सोडतो आणि पोलीस ठाणे प्रमुख कळसुत्री बाहुला बनून त्या हुकुमाची अंमलबजावणी करतो, असे तुम्हाला कुणी सांगितले तर तुम्ही म्हणाल हे एखाद्या चित्रपटातील कथानक आहे…. परंतु चित्रपटाच्या कथानकालाही लाजवतील अशा काही वास्तव कथा आपल्या आसपास घडतच असतात…
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा धोक्यात येऊन वृद्धापकाळातील त्यांचे जिणे असुरक्षित बनले असतानाच गृह विभागाने आदेश जारी करून सोपवलेली जबाबदारीही पार पाडायला हिमायतनगर पोलिसांना वेळ का मिळत नाही? ते खुलेआम कर्तव्यात कसूर का करतात? की कुणाचा तरी ‘हुकुम’ आल्याखेरीज त्यांचे पानही हालत नाही? असे सवाल आता चर्चेत आले आहेत.
एक पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि ४५ हून अधिक पोलीस कर्मचारी असा हिमायतनगर पोलीस ठाण्याचा एकूण स्टाफ आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तालुक्याची विभागणी बीटमध्ये करण्यात आली असून प्रत्येक बीटची जबाबदारी एका जमादारावर देण्यात आली आहे. परंतु हे बीट जमादार हिमायतनगर पोलीस ठाण्यातच तळ ठोकून बसतात. त्यांच्या बीटकडे फिरकतही नाहीत. मग ते नेमके काय करतात? याबाबत पोलीस ठाणे प्रमुख त्यांना जाबही विचारत नाहीत की काय?, असेच एकंदर चित्र आहे.
त्यामुळेच गेल्या काही दिवसांत हिमायतनगर तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी बस स्थानकावर दिवसाढवळ्या एका तरूणाचा खून करण्यात आला होता. त्यानंतर वाशीच्या डोंगरात दगडाने ठेचून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. ताजी घटना सोनारी येथे झालेल्या हाफमर्डरची आहे. याचाच अर्थ गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. शास्त्रशुद्ध पोलिसिंग करण्यात हिमायतनगर पोलीस कमी पडू लागल्यानेच गुन्हेगारांची भीड चेपत चालली आणि गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील जवळपास प्रत्येकच गावात अवैध देशी दारूची विक्री खुलेआम सुरू आहे. गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही या तक्रारींच्या अनुषंगाने हिमायतनगर पोलीस कारवाईच करत नसल्याचे चित्र आहे. आदर्श गाव म्हणून नावाजलेली गावेही या अवैध दारू तस्करांच्या कचाट्यातून सुटलेली नाहीत. सप्टेंबर महिन्यात आदर्श गाव टेंभी येथील गावकऱ्यांनी गावात अवैध देशी दारू विक्री करणारांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तरीही येथील दारूची तस्करी आणि अवैध विक्री बंद झाली नाही, यावरूनच हिमायतनगर पोलिसांच्या कर्तव्यपरायणतेची साक्ष मिळते.
दुसरीकडे सर्वसामान्य माणूस त्याच्यावर झालेल्या अन्याय-अत्याचार, छळ आणि पिळवणुकीची फिर्याद घेऊन पोलीस ठाण्यात गेल्यास त्याला दोन- दोन तास ताटकळवले जाते. त्याने दिलेल्या फिर्यादीची साधी पोचही दिली जात नाही. त्या सर्वसामान्य माणसाने ज्याच्या विरोधात फिर्याद दिली, त्याच्याविरोधात पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली किंवा एफआयआर दाखल केला की नाही? याची माहिती देणेही हिमायतनगर पोलिसांना गरजेचे वाटत नाही.
एफआयआर दाखल करायचा की केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून द्यायचे? याचे काही निकष आणि नियम आहेत, पण त्याचेही पालन केले जात नाही. त्यासाठीही त्यांना ‘अपने आका’चाच आदेश लागतो की काय? हेही कळायला मार्ग नाही. अवैध धंदेवाले आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी पोलिसांचे हे ममत्वच तालुक्यातील गुन्हेगारी बोकाळण्याला आणि सर्वसामान्य माणसात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास कारणीभूत ठरू लागले आहे.