मुंबईः आज (गुरुवारी) सकाळी १० वाजून २० मिनिटांची वेळ. हजारो स्मार्टफोनवर एकाच वेळी अचानक एक इमर्जन्सी अलर्ट आला. ज्यांच्या मोबाइलवर कॉल सुरू होते, अशांचे मोबाइल हॅण्डसेट व्हायब्रेट होऊन कसला तरी अलर्ट देऊ लागले… अचानक आलेल्या या इमर्जन्सी अलर्टमुळे ही नेमकी काय भानगड आहे, हे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे अनेकजण गोंधळून गेले. काही जणांना वाटले आपला मोबाइल हॅण्डसेट हॅक केला गेला आहे… काही जणांना वाटले हा फ्रॉड अलर्ट आहे… त्यामुळे अनेकांनी या इमर्जन्सी अलर्टला कोणताही प्रतिसाद न देणेच पसंत केले. सर्वच मोबाइल वापरकर्त्यांमध्ये या इमर्जन्सी अलर्टमुळे संभ्रम निर्माण झालेला असतानाच या इमर्जन्सी अलर्टमुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून घेण्यात आलेला एक चाचणी संदेश आहे.
आणीबाणीच्या परिस्थितीत किंवा मोठ्या संकटाच्या काळात देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याची यंत्रणा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने विकसित केली जात आहे. या यंत्रणेची चाचणी आज सकाळी एकाच वेळी इमर्जन्सी अलर्ट देऊन घेण्यात आली. त्यामुळे मोबाइल वापरकर्त्यांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता दूरसंचार विभागाने या इमर्जन्सी अलर्ट प्रणालीची चाचणी घेतल्यामुळे मोबाइल वापरकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. ही चाचणी घेण्याआधी पूर्वसूचना देण्यात आली असती तर मोबाइल वापरकर्त्यांनी या चाचणी प्रणालीला प्रतिसादही दिला असता. परंतु तसे झाले नाही. परिणामी मोबाइल वापरकर्ते गोंधळून गेले.
तुम्ही वास्तव्यास असलेल्या परिसरात पूर, भूस्खलन, भूकंप इत्यादींसारखी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असेल तर नागरिकांना एकाचवेळी इमर्जन्सी अलर्ट देऊन सावधानतेचा इशारा देता यावा, यासाठी भारतीय दूरसंचार विभागाने वायरलेस सिग्नल्सची प्रणाली विकसित केली आहे. त्या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी आज सकाळी जवळपास सर्वच मोबाइल फोनवर हा इमर्जन्सी अलर्ट देण्यात आला आहे.
आज सकाळी १० वाजून २० मिनिटांनी सर्वच मोबाइलवर एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काहीवेळाने म्हणजेच १० वाजून ३१ मिनिटांनी मराठीमध्येही एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे, असे या इमर्जन्सी अलर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.
तुमच्याही मोबाइलवर असा इमर्जन्सी अलर्ट आला असेल तर घाबरून जाऊ नका. घाबरून जाण्याऐवजी या इमर्जन्सी अलर्टचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाइल फोनवर ऑन करा. एकदा का तुम्ही हे वायरलेस नोटिफिकेशन ऑन केले की तुमच्या भागातील नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या परिस्थितीबाबतचे इमर्जन्सी अलर्ट तुम्हाला मिळत राहतील.