औरंगाबादचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर, प्रशासन अधिकारी सांजेकर यांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश


पुणेः प्रचलित नियम आणि कायदे गुंडाळून नियमबाह्य कामे करून ‘मालामाल’ झाल्याचे आरोप असलेले औरंगाबादचे विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) आणि याच कार्यालयातील प्रशासन अधिकारी तथा वेतन पथक प्रमुख व्ही. यू. सांजेकर यांच्या कारभाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले असून मुंबईचे विभागीय सहसंचालक केशव तुपे यांची एक सदस्यीय समिती ही चौकशी करणार आहे. त्यामुळे औरंगाबाद विभागीय सहसंचालक कार्यालयातील हडेलहप्पीचा पर्दाफाश होण्याची शक्यता बळावली आहे. औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील अनियमियतता आणि गैरव्यवहारावर न्यूजटाऊनने वेळोवेळी प्रकाश टाकला आहे.

डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी औरंगाबादच्या विभागीय सहसंचालकपदाचा आणि श्रीमती वनिता उदयराव उर्फ व्ही. यू. सांजेकर यांनी याच कार्यालयात प्रशासन अधिकारीपदाचा  स्वीकारल्यापासून महाराष्ट्र शासनाचे प्रचलित नियम/कायदे आणि शासनादेश धाब्यावर बसवून नियमबाह्य कामकाजांना मान्यता देण्याचा सपाटाच लावला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्या तक्रारींची दखल घेऊन न्यायोचित कारवाई करण्यात आलेली नाही, असा या दोघांवरही आरोप आहे.

हेही वाचाः उच्च शिक्षण संचालनालयाची विभागीय कार्यालये बनली भ्रष्टाचार, नियमबाह्य कामाचे अड्डे, कोल्हापुरातील कारवाईने पितळ उघडे!

खुलताबाद येथील चिश्तिया महाविद्यालयातील जवळपास सर्वच प्राध्यापकांच्या नियुक्त्या बोगस आहेत. किमान अर्हता धारण न करता चिश्तिया महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्याबाबतच्या तक्रारी पुराव्यानिशी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तत्कालीन सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी चिश्तिया महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन बंद करून चौकशी सुरू केली होती. परंतु ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाकडे हेतुतः दुर्लक्ष करून चिश्तिया महाविद्यालयातील प्राध्यापकांना वेतन अदा करणे सुरू केले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सहसंचालकपदावर बसून डॉ. सुरेंद्र ठाकूर हे बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत आणि त्यामुळे सार्वजनिक निधीचा मोठ्याप्रमाणावर दुरूपयोग केला जात आहे, असाही त्यांच्यावर आरोप आहे.

हेही वाचाः उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात ‘ठाकुरी जादू’चे प्रयोग सुरेल प्रयोगः न्यायप्रविष्ठ प्रकरणात ‘कॅस’ करण्यास आधी नकार, नंतर होकार!

जालना येथील जे.ई. एस. शिक्षण संस्थेच्या आर.जी. बागडिया कला, एस.बी. लखोटिया वाणिज्य आणि आ. बेझोन्जी विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. गणेश अग्नीहोत्री यांची नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली आहे. यूजीसीच्या नियमाप्रमाणे ते १५ वर्षे सहयोगी प्राध्यापकपदावर काम केल्याचा अनुभव धारणच करत नाहीत. तत्कालीन सहसंचालक डॉ. आर. एस. धामणस्कर यांनी डॉ. अग्नीहोत्री यांची अजिंठा शिक्षण संस्थेच्या सोयगाव आणि औरंगाबाद येथील महाविद्यालयात प्राचार्यपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यावर आक्षेप आल्यावर कायदेशीर सुनावणी घेऊन प्राचार्यपदावरील त्यांची नेमणूक नियमबाह्य ठरवून त्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यास आणि वेतनात नाव समाविष्ट करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

हेही वाचाः प्राचार्य अग्नीहोत्री प्रकरणात ‘साप सोडून भुई धोपटण्याचा’ सहसंचालकांचा प्रयत्न, एचटीई सेवार्थसाठी जोरदार आटापिटा!

तरीही डॉ. अग्नीहोत्री यांना नियमबाह्यपणे वेतन देण्यात आले आणि आता जालना येथील जे.ई. एस. शिक्षण संस्थेच्या आर.जी. बागडिया कला, एस.बी. लखोटिया वाणिज्य आणि आ. बेझोन्जी विज्ञान महाविद्यालयात डॉ. अग्नीहोत्री यांची बेकायदेशीर नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा त्यांना मान्यता देऊन त्यांचे नाव वेतनात समाविष्ट करण्याची प्रक्रिया डॉ. ठाकूर यांनी सुरू केली.

हेही वाचाः चिश्तिया महाविद्यालयातील २००१ पूर्वीच्या सर्वच नियुक्त्या नियमबाह्य, सहसंचालक कार्यालयाकडून मूळ मुद्द्याकडेच दुर्लक्ष

उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. ठाकूर आणि प्रशासन अधिकारी सांजेकर यांच्यासह वरिष्ठ लेखापालांचा हा प्रयत्न संगनमत आणि गुन्हेगारी हेतूने सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आहे, अशी तक्रार रिपब्लिकन बहुजन सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे केली होती. या दोन प्रकरणांबरोबरच डॉ. ठाकूर, सांजेकर आणि वरिष्ठ लेखापालांनी अनेक प्रकरणात मोठ्या प्रमाणावर हडेलहप्पी केल्याचा आरोप आहे.

हेही वाचाः संस्थाचालकांची फुल्ल टू चाटुगिरी करत प्रशासन अधिकारी सांजेकरांच्या प्राध्यापकांना धमक्या, फुकट पगार घ्यायला लाज…

औरंगाबादचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांना तत्काळ पदावरून दूर हटवून त्यांच्यासह प्रशासन अधिकारी व्ही. यू. सांजेकर आणि वरिष्ठ लेखापाल यांच्या कार्यकाळातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी वडमारे यांनी उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर १९ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

या उपोषणाची दखल घेत उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी औरंगाबादचे विभागीय सहसंचालक डॉ. ठाकूर, प्रशासन अधिकारी सांजेकर आणि वरिष्ठ लेखापाल यांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतचे आदेश आज, २० जुलै रोजी जारी करण्यात आले. (पत्र क्रमांकःममअ-ब/२०२३/तक्रार/डॉ. ठाकूर/प्रशा-१/गोप-४८, दिनांक २०/०७/२०२३)

हेही वाचाः एवढी मग्रुरी येते कुठून?: सहसंचालकांच्या ‘कारणे दाखवा’ला सांजेकरांचा कोलदांडा, मंत्रालयाचा चौकशी आदेशही दडपला!

औरंगाबाद विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयातील नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामकाजाची चौकशी करण्यासाठी मुंबईचे विभागीय सहसंचालक डॉ. केशव तुपे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालकांच्या वतीने उच्च शिक्षण कार्यालयातील सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी हे आदेश जारी केले आहेत.

सांजेकरांवर आधीच शिस्तभंग, नाचक्की केल्याचा ठपका

औरंगाबाद विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी तथा वेतन पथक प्रमुख व्ही. यू. सांजेकर यांच्याबद्दल विभागातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षण संस्थाचालकांच्याही असंख्य तक्रारी आहेत. त्या तक्रारींची दखल घेत उच्च शिक्षण संचालकांनी या आधीच सांजेकरांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. कार्यालयीन शिस्तीचा भंग आणि उच्च शिक्षण विभागाची नाचक्की केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची ही प्रक्रिया सुरू असतानाच आता सांजेकरांना नव्या उच्चस्तरीय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!