भाजप आमदार प्रशांत बंब यांना पराभवाचा धक्का, ‘गंगापूर’ची सत्ता ठाकरे गटाच्या ‘कृष्णा’कडे; विधानसभेला भाकरी परतणार?


गंगापूरः गंगापूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे आमदार आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत बंब यांच्या पॅनलला पराभवाची धुळ चारत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कृष्णा डोणगावर यांच्या शेतकरी शिवशाही पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत आमदार बंब यांच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. ते स्वतःही या निवडणुकीत पराभूत झाले. गंगापूर कारखान्याच्या निवडणुकीचा हा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील बदलत्या समीकरणांची नांदी मानला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद असला तरी गंगापूर तालुक्याचे राजकारण याच कारखान्याभोवती फिरत आले आहे. कोट्यवधी रुपये कर्जाच्या खाईत बुडालेला हा कारखाना कर्जमुक्त करून पुन्हा सुरू करून दाखवू, अशी आश्वासने नेहमीच दिली जातात. याही निवडणुकीत दोन्ही बाजूंनी असेच आश्वासन दिले होते. त्यामुळे तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते.

भाजप आमदार प्रशांत बंब यांनी या निवडणुकीत सभासद कामगार विकास पॅनलच्या नावाखाली या २० उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कृष्णा डोणगावकर यांनी शिवशाही शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरवून आ. बंब यांच्याविरोधात शड्डू ठोकला. या निवडणुकीत बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

गंगापूर साखर कारखान्याच्या २१ संचालकांपैकी एक जागा बिनविरोध निवडून आली होती. उर्वरित २० जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. कारखान्याच्या एकूण १४ हजार ६६ मतदारांनी म्हणजेच एकूण मतदारांपैकी ५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत शिवशाही शेतकरी विकास पॅनलचे कृष्णा डोणगावकर, संजय जाधव, सुरेश मनाळ, प्रवीण वालतुरे, कचरू शिंदे, बाबुलाल शेख, मधुकर साळुंके, शेषराव साळुंके, अप्पासाहेब गावंडे, मनोहर दुबिले, प्रल्हाद निरफळ, तुकाराम कुंजर, शेषराव पाटेकर, दिलीप बनकर, कारभारी गायके, दादासाहेब जगताप, काशीनाथ गजहंस, माया दारूंटे, शोभा भोसले, नामदेव दारूंटे, देवचंद राजपूत हे संचालक विजयी झाले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोणगावकर आणि बंब या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र गंगापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत विजयश्री खेचून आणणारे भाजप आमदार प्रशांत बंब यांची जादू या निवडणुकीत चालली नाही. त्यांच्या पॅनलचा एकही उमेदवार या निवडणुकीत निवडून येऊ शकला नाही. एवढेच काय आमदार प्रशांत बंब हे स्वतःही या निवडणुकीत निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील बदलत्या समीकरणाची नांदी असल्याचे राजकीय जाणकारांना वाटते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!