गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणार


मुंबई: राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया येत्या देान महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, रोईंगपटू दत्तू भोकनळ आणि आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके यांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

सन २०१८ मध्ये अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत नियुक्ती देण्याबाबतचे सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा आढावा घेण्यासाठी शासनामार्फत समिती नेमण्यात आली असून या समितीचा लवकरच अहवाल प्राप्त होईल. या अहवालाचा अभ्यास करुन सुधारित क्रीडा धोरणानुसार गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे महाजन म्हणाले.

अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाच्या गट अ ते गट ड मधील पदांवर थेट नियुक्तीसाठी क्रीडा अर्हताही निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय दिव्यांग खेळाडूंचीही गट अ ते गट ड मधील पदांवरील क्रीडा प्राविण्य अर्हता निश्चित करण्यात आली असून या निकषाधारे आतापर्यंत ६७ खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे, असे महाजन म्हणाले.

याशिवाय गुणवत्ताधारक खेळाडूंच्या सेवा घेऊन गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने खेळाडूंच्या थेट नियुक्तीच्या धोरणात सुधारणा करण्यात येत आहे, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!