नागपूर: ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली.
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
शेततळे मंजूर करण्याची कार्यवाही जरी कृषी विभाग करत असला तरी ती राबवण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो. त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल, असेही मुंडे म्हणाले.
कोकण क्षेत्रात जमिनी व भौगोलिक परिस्थिती थोड्या-थोड्या अंतरावर बदलते, त्यामुळे शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील दरफरक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईल, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात, बबनराव लोणीकर, प्रकाश सोळंके, नाना पटोले, ॲड. आशिष शेलार, बबनराव लोणीकर आदींनी या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला.