
नवी दिल्लीः भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी यंदाच्या मोसमासाठीचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात एल निनो सक्रीय होणार असल्यामुळे यंदाच्या मोसमात सरासरीच्या ९० टक्केच पाऊस होण्याची शक्यता आहे. नेहमीपेक्षा कमी पावसाच्या शक्यतेमुळे शेतीवर मोठा परिणाम होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्वांचीच चिंता वाढली आहे.
आयएमडीच्या या अंदाजानुसार यंदा जून महिन्यांतच एल निनो सक्रीय होईल आणि हळूहळू एल निनोचा प्रभाव वाढत जाईल. परिणामी जून महिन्यात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात उष्णतेच्या लाटा तीव्र राहण्याची शक्यता आहे. एल निनोच्या सावटामुळे जून ते सप्टेंबरदरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९० टक्के होण्याची शक्यता आहे. या अंदाजामध्ये चार टक्के कमी-अधिक परिणाम दिसून येऊ शकतो. याचा अर्थ २०२६ च्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) संपूर्ण देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल.
यापूर्वी हवामान विभागाने एप्रिल महिन्यात वर्तवलेल्या अंदाजात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. सुधारित दीर्घकालीन अंदाज हे प्रमाण आणखी खाली घसरल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या प्रशांत महासागरात एन निनोची परिस्थिती निर्माण होत आहे. ही प्रणाली भारतात नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात पोहोचण्याचा अंदाज आहे. त्याचा भारतातील खरिप पिकांवर मोठा परिणाम होणार आहे.
यंदाच्या मोसमात ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य म्हणजेच दीर्घकालीन सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे. तर मध्य व दक्षिण द्विपकल्पीय भारतात सरासरीच्या ९४ टक्के तर वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९२ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.
मान्सून गाभा क्षेत्रातही पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता असून जून महिन्यात संपूर्ण देशभरातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता आहे. जूनमध्ये देशाच्या बहुतेक भागात सरासरीपेक्षा कमी मासिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र वायव्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण द्विपकल्पाचा काही भाग तसेच मध्य भारतातील काही तुरळक भाग वगळता अन्य भागात सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटा
जूनमध्ये देशाच्या बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त मासिक कमाल तापमान असण्याची शक्यता आहे. मात्र मध्य, वायव्य आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता सामान्य ते सरासपेक्षा कमी कमाल तापमान असण्याची दाट शक्यता आहे. वायव्य, मध्य आणि लगतच्या दक्षिण द्विपकल्पीय भारताचे काही भाग वगळता देशाच्या बहुतेक भागामध्ये मासिक किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि तामीळनाडूमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा असतील, असे या अंदाजात म्हटले आहे.
