भारतात व्हॉट्सअपचे सर्व्हर डाऊन, कोट्यवधी यूजर्स हैराण!


मुंबईः जगभरात कोट्यवधी यूजर्स असलेले लोकप्रिय सोशल मेसेंजिग ऍप व्हॉट्सअप भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास डाऊन झाले. तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअप डाऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकानंतर एक मेसेज फॉर्वर्ड करण्याची सवय असलेले अनेक यूजर्स व्हॉट्सअप बंद पडलंय का? अशी विचारणा फेसबुक आणि ट्विटरवर करू लागले आहेत.

दुपारी १२ वाजेपासून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मेसेज पाठवता येत नव्हते. काही काळानंतर मात्र व्हॉट्सअपचे पर्सनल चॅटही बंद झाले आहे. भारतातील लक्षावधी यूजर्सना ही समस्या येत असल्याचे मेसेज फेसबुक आणि ट्विटरवर पडू लागले आहेत.

गेल्या काही वेळापासून व्हॉट्सअपच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. या तांत्रिक बिघाडासंदर्भात व्हॉट्सअपकडून अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा बिघाड नेमका कधी दुरूस्त होईल? याबाबत काहीही अंदाज बांधता येत नाही.

 व्हॉट्सअपचे भारतातील सर्व्हर क्रॅश झाले आणि त्यामुळे लोक एक दुसऱ्यांना मेसेज पाठवू शकत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर गमतीशीर मीम्स शेअर करण्यात येऊ लागले आहेत. आजकाल व्हॉट्सअप हे लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.

जगभराबरोबरच भारतातील लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले फोटो, मेसेज एक-दुसऱ्याशी शेअर करत असतात. मात्र गेल्या एक तासापासून व्हॉट्सअपचे सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे लोकांना एकमेकांना संदेश पाठवता येणे अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे लोक आता अडगळीत पडलेल्या टेक्स्ट मेसेजचा वापर करू लागले आहेत. एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी अन्य ऍप्सचाही वापर करण्यात येऊ लागला आहे.

भारतात सरकारी आणि खासगी कार्यालयात काम करणाऱ्या लोकांबरोबरच अन्य व्यवहारांशी संबंधित लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून  एकमेकांच्या संपर्कात राहतात. युवा वर्गाकडूनही संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात व्हॉट्सअपचे सर्व्हर डाऊन झाले. सुरूवातीला कुणालाच काहीही कळले नाही. परंतु टीव्ही चॅनल्स आणि न्यूजपोर्टल्सवर व्हॉट्सअपचे सर्व्हर डाऊन झाल्याच्या बातम्या झळकताच सगळीकडे अस्वस्थता पसरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!