छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित केला जाणारा वेरुळ-अजिंठा महोत्सव यंदा २, ३ व ४ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल येथे होत आहे. या महोत्सवात जिल्हावासियांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेस राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे दिलीप शिंदे, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे आदी उपस्थित होते.
पर्यटन विभागाचे विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १९८५ पासून वेरुळ येथील कैलास लेणीसमोरील जागेमध्ये जगविख्यात वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची सुरूवात केली होती. २००२ पासून या महोत्सवाचे रूपांतर वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले.
प्रतिवर्षी प्रमाणे सन २०१६ मध्ये वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागच्या काही काळात विविध कारणामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. फेब्रुवारी २०२३ मध्ये ७ वर्षानंतर अजिंठा- वेरूळ महोत्सव घेण्यात आला. त्याचप्रमाणे या वर्षी २,३ व ४ फेब्रुवारी या कालावधी मध्ये महोत्सव घेण्याचे निश्चित केले आहे, असे ते म्हणाले.
वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवा निमित्त पर्यटनाला चालना देण्याची व भारतीय अभिजात कला, नृत्य, साहित्य-संस्कृती यांच्या प्रचाराची मोठी संधी मिळाली आहे. या वर्षी २,३ व ४ फेब्रुवारी रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, वादन व शास्त्रीय नृत्य इत्यादी सादर केले जाणार आहे. या महोत्सवात संध्या पुरेचा व चमू, अनुराधा पाल व चमू, राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, अमान व अयान, कैलाश खेर तसेच वैदेही परशुरामी, उर्मिला कानेटकर-कोठारी, श्रेया घोषाल व इतर कलाकार कला सादर करणार आहेत.
पूर्वरंगने होणार महोत्सवाला प्रारंभ
पूर्वरंग हा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची नांदी असलेला पूर्वरंग कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. याचे उद्घाटन शनिवारी २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री वित्त डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे हे अध्यक्षस्थानी असतील.
अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे सहअध्यक्ष असतील. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे प्रमुख पाहुणे असतील. यावेळी खा. इम्तियाज जलील, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ.हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. उदयसिंग राजपूत, आ. रमेश बोरनारे यांचीही उपस्थिती असेल.
दोन दिवस रंगणार पूर्वरंग
वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची घोषणा करणारा पूर्वरंग कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्त करण्यात आले असून शनिवार २० व रविवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी हा कार्यक्रम होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे होत असलेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
त्यात शनिवार २० जानेवारी रोजी सायंकाळी उदघाटन सोहळा, सांयकाळी ७ ते ७.४० दरम्यान श्रीमती निधी प्रभु व सहकारी अनुभूती कथ्थक नृत्य सादर करतील. सायंकाळी ७.४० ते ८.२० वाजता शाहीर रामानंद उगले हे महाराष्ट्राची लोकगाणी सादर करतील.
रात्री ८.३० ते १० वाजता प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर व ढोलकी सम्राट पाडुंरंग घोटकर, कृष्णा मुसळे हे लोकोत्सव साजरा करतील.
रविवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजता सई बारबोटे यांचे तबला वादन, सायंकाळी ७ ते ७.३० वाजता डॉ. स्विकार कट्टी यांचे सतार वादन, सायंकाळी ७.३० ते रात्री १० वाजता अविनाश विश्वजीत लाईव्ह इन कॉन्सर्ट होईल. यात रोहित राऊत, मधुरा कुंभार, दिप्ती भागवत व रवींद्र खोमणे यांचा सहभाग असेल.
पूरक कार्यक्रमांची रेलचेल
वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त यंदा शहरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गायन वादन सादरीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पूर्वरंग’ कार्यक्रमानंतर हे कार्यक्रम होतील. यामध्ये २३ जानेवारी रोजी कॅनाट प्लेस येथे , २५ जानेवारी रोजी क्रांती चौकात आणि २८ जानेवारी रोजी छावणी येथे लोककलांचे सादरीकरण होईल.
महोत्सवात होईल यांचे सादरीकरण
वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवास २ फेब्रुवारी रोजी सोनेरी महल येथे प्रत्यक्ष सुरूवात होईल. त्यात शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजता डॉ. संध्या पुरेचा व चमू यांचे भरतनाट्यम , रात्री ८ ते ९ वाजता अनुराधा पाल व चमू यांचे वादन, रात्री ९ ते ११ वाजता राहूल देशपांडे व प्रियंका बर्वे यांचे शास्रीय/ उपशास्त्रीय गायन होईल.
शनिवारी ३ फेब्रुवारी सायंकाळी ७ ते ८ वाजता अमान व अयान यांचे सरोद वादन, रात्री ८ ते १० वाजता कैलाश खेर व चमू यांचे सुफी सादरीकरण होईल.
रविवारी ४ फेब्रुवारी सांयकाळी ७ ते ७.४५ वाजता श्रीमती वैदेही परशुरामी व उर्मीला कानेटकर-कोठारी यांचे कथ्थक, रात्री ८ ते १०.३० वाजता श्रेया घोषाल व चमू यांचे सादरीकरण होईल.
महोत्सव पश्चात उत्तररंग हा कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यात सायं ७ ते ९.३० वाजता पं. विजय घाटे यांचे ताल दिंडी व ममता जोशी यांचा सुफीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.