‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा

औरंगाबाद: राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांच्या ठिकाणी केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. भगवान साखळे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. जयश्री सूर्यवंशी या जन्माने मराठा जातीच्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांनी राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्र काढले. याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवली.

या अनुभवाच्या जोरावरच त्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव झाल्या. ही ‘भामटेगिरी’ उघडकीस आल्यानंतर डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आपल्याकडे असलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र केवळ ‘शोभेची वस्तू’ असून त्याचा आपण कुठेही वापर केला नसल्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
विद्यापीठ प्रशासनाने कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी ‘महिला अस्त्र’ही उपसले होते. आपल्या कोणत्याच बाबीत खोट नसताना केवळ महिला म्हणून आपल्या त्रास दिला जात आहे, आपली छेड काढली जात आहे, अशा तक्रारी त्यांनी राज्य महिला आयोग, औरंगाबाद पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. तरीही कुठेच डाळ न शिजल्यामुळे अखेर त्यांना पाय उतार व्हावे लागले.

वैयक्तिक कारणांमुळे स्वखुशीने कुलसचिवपदाचा राजीनामा देत असल्याचे सूर्यवंशी यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
आता प्रभारी कुलसचिव म्हणून केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा.डॉ. भगवान साखळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!