खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासूर ‘कृऊबा’मध्ये विलिनीकरणास अंतरिम स्थगिती


नागपूरः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विलिनीकरण करण्याच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशास पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. याप्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत विलिनीकरण करण्याची अधिसूचना १३ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केली होती. या अधिसूचनेला गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील अनिल राजाराम चव्हाण आणि माळीवडगाव येथील शेषराव भाऊराव जाधव यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन ( विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम ४४ मधील तरतुदींनुसार पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि डोणगाव येथील कृष्णा साहेबराव डोणगावकर यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या अपिलावर नागपूर विधान भवनातील त्यांच्या दालनात ८ डिसेंबर रोजी या अपिलावर सुनावणी घेतली आणि १२ डिसेंबर रोजी आपला निर्णय जाहीर केला.

मुख्यमंत्री तथा पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ५ एप्रिल २०२३ रोजी झालेली बैठक आणि ६ एप्रिल २०२३ रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसार खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत विलिनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करून अधिसूचना जारी केल्याचा युक्तीवाद जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केला. तर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियमातील कलम ५२ (ब) नुसार हे अपिलच दखलपात्र नसल्याचा आणि या अपिलात पणन मंडळ किंवा खुलताबाद कृषी उत्पन बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद कृष्णा डोणगावकर यांनी केला.

खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया प्रस्तावित असताना स्थानिक प्रशासकाने अधिकार नसताना विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली. निवडणूक प्रक्रिया पार पडून लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळही कार्यरत आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेला जनाधार दिसून येत नाही. दोन बाजार समित्या एकत्रित करताना त्यांची दायित्वे, कर्तव्ये व बंधने यांचीही तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी चव्हाण आणि जाधव यांच्या वकिलींनी केली.

 पणन मंडळाच्या संचालकांनी २४ ऑगस्ट २०१६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सक्षमीकरण आणि ड वर्गीय कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे विलिनीकरण करण्याच्या सूचना आहेत. पणन मंडळाच्या संचालक मंडळाच्या १४९ व्या बैठकीतील इतिवृत्तानुसार खुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे लातूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत विलीकरण करण्यात आले आहे.

मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन संचालक मंडळही स्थापन झाले आहे. त्यामुळे लोकनियुक्त संचालक मंडळाला पणन कायद्यातील तरतुदींनुसार कमकाज करणे शक्य होत नसल्याचे सांगत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी खुलताबाद बाजार समितीचे लासूर स्टेशन बाजार समितीत विलिनीकरण करण्याच्या जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशास अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणात अंतिम निर्णय होईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!