नागपूर: पुण्यातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका या ठिकाणच्या ७५ हजार औद्योगिक मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले असून राज्यातील इतरही महानगरपालिकांच्या हद्दीत टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधान परिषदेत आमदार श्रीमती उमा खापरे यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सचिन अहिर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
पुणे जिल्ह्यातील तळवडे येथील मे. राणा इंजिनियरिंग, ज्योतिबा नगर येथे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याच्या कारखान्यात ८ डिसेंबर रोजी स्फोट होऊन एकूण ११ कामगार मृत्यूमुखी पडले असून यामध्ये ६ महिला कामगारांचा समावेश आहे. स्फोटात १० कामगार जखमी झाले होते, असे फडणवीस म्हणाले.
या घटनेच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. ज्याठिकाणी दुर्घटना घडली तेथे कच्चे बांधकाम असलेल्या इमारती व एक शटर असलेल्या शेडमध्ये औद्योगिक कारखाना सुरु असल्याचे निदर्शनास आले. या कारखान्यात शोभेच्या दारुपासून वाढदिवसाकरिता वापरण्यात येणारे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याचे काम सुरु होते, असे फडणवीसांनी सांगितले.
या ठिकाणी व्यवसाय मालकाव्दारे नियुक्त महिला कामगार काम करीत होत्या. हा व्यवसाय अवैध असून परवानगी घेतलेली नव्हती. ही जागा रेड झोनमध्ये समावीष्ट असून तळवडे परिसरात साधारणपणे ३००० विविध प्रकारच्या आस्थापना कार्यरत आहेत. या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना न केल्याने ही घटना घडली, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
दुर्घटनेच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीसांनी कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. कंपनीवर कामगार कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन झाले आहे त्या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
अपघात झालेल्या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. धोकादायक उद्योगांवर निर्बंध टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. अशा धोकादायक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येत असून येऊन कंपनींच्या आत व परीसरातील अवैध कामांवर निर्बंध घालण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.