प्रशासन अधिकारी सांजेकरांवर शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू, उच्च शिक्षण संचालकांनी बजावली कारणे दाखवा नोटीस


औरंगाबादः आपली वर्तणूक, व्यवहार आणि कामकाजाच्या पद्धतीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी वनिता उदयराव उर्फ व्ही. यू. सांजेकर यांच्याविरुद्ध उशिरा का हाईना पण  शिस्तभंगाच्या कारवाईची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी सांजेकरांना दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद विभागातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थाचालकांना सांजेकरांच्या जाचापासून ‘मुक्ती’ मिळण्याची शक्यता बळावली आहे.

औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी व्ही. यू. सांजेकर यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल विविध प्राध्यापक संघटना आणि संस्थाचालकांनी सहसंचालक आणि उच्च शिक्षण संचालकांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरीही त्यांच्या विरोधात उच्च शिक्षण संचालकांकडून कोणतीही कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे आपले ‘कुणीच वाकडे’ करू शकत नाही, अशा अविर्भात सांजेकर वर्तन करत होत्या आणि प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थाचालकांची पिळवणूक करत होत्या.

हेही वाचाः संस्थाचालकाची फुल्ल टू चाटूगिरी करत प्रशासन अधिकारी सांजेकरांच्या प्राध्यापकांना धमक्या, फुकट पगार घ्यायला लाज…

मे महिन्यात तर सांजेकरांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील महाविद्यालयात जाऊन कहरच केला होता. या महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आपले गुलाम आहेत, अशा पद्धतीने सांजेकरांनी त्यांच्याशी वर्तन केले होते. अरेरावी आणि उद्धटपणाची भाषा करत प्राध्यापकांना अपमानित करत संस्थाचालकाची फुल्ल टू चाटुगिरी केली होती. या चाटुगिरीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर औरंगाबाद विभागातील प्राध्यापक संघटना संतप्त झाल्या होत्या. त्यांनी सहसंचालक आणि उच्च शिक्षण संचालकांकडे तक्रारी करत सांजेकरांविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. सांजेकरांविरुद्ध आठ महिन्यांपासून दाखल करण्यात आलेल्या विविध तक्रार अर्जांवरची धुळ अखेर उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी झटकली असून सांजेकरांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. सांजेकरांविरुद्ध जे आरोप ठेवून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यातील आरोप असेः

बनावट सेवापुस्तिका बनवल्या

 उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी सांजेकरांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत जी कारणे दिली आहेत, त्यातील सर्वात गंभीर कारण आहे ते बनावट सेवापुस्तिका तयार करून दिल्याचे.

हेही वाचाः सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी सांजेकरांकडून शासन आदेशाचीच पायमल्ली, वरिष्ठांच्या अधिकारातही अधिक्षेप!

लोहारा येथील भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेला विचारात न घेताच सांजेकर यांनी या संस्थेच्या शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बनावट सेवापुस्तिका तयार करून दिल्याचा आरोप आहे. महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्रभारी प्राचार्यांशी संगनमत करून आणि संस्थेची पूर्वपरवानगी न घेताच सांजेकरांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेची दुसरी प्रत तयार करून दिल्याची तक्रार या संस्थेच्या सचिवांनी उच्च शिक्षण संचालकांकडे ३ नोव्हेंबर २०२२ रोजी केली होती.

शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप

सांजेकर या मनमानी करून शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करून प्राध्यापकांमध्ये अकारण भीती निर्माण केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबतची तक्रार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने १० मे २०२३ रोजी उच्च शिक्षण संचालकांकडे केली होती. सांजेकर या सहसंचालकांची पूर्वपरवानगी न घेताच माकणी येथील महाविद्यालयात चौकशीसाठी गेल्या असता तेथील प्राध्यापकांशी हिटलरशाही पद्धतीने बोलून शासकीय कर्तव्य विसरणे, पातळी सोडून बोलून अवमानित करणे, मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा गुंडाळून ठेवून संस्थाचालक हाच महाविद्यालयाचा मालक आहे, असा दम प्राध्यापकांना देणे आणि ‘लाईट लागली मी सत्य बोलते,’ असे सांगून अंधश्रद्धेला खतपाणी घालत अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणे इत्यादी आरोप सांजेकरांवर ठेवण्यात आले आहेत. सांजेकर या प्राध्यापकांबद्दल कायम पूर्वग्रहदूषित आसूया बाळगत असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

हेही वाचाः एवढी मग्रुरी येते कुठुन?:  सहसंचालकांच्या ‘कारणे दाखवा’ला सांजेकरांचा कोलदांडा, मंत्रालयाचा चौकशी आदेशही दडपला!

वेतन बंद करण्याच्या धमक्या

सांजेकर या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलून अपमानित तर करताच, शिवाय संस्थाचालकांना सांगून तुमचे वेतन बंद करीन, अशा उघड धमक्याच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देत असल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सांजेकर या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका दाबून ठेवतात आणि कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी करतात, अशाही तक्रारी आहेत. याबाबतची तक्रार विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी उच्च शिक्षण संचालकांकडे ११ मे २०२३ रोजी केली होती.

हेही वाचाः उच्च शिक्षण सहसंचालकांच्या वरिष्ठ लिपिकाची चौकशी तब्बल सात महिन्यांपासून गुलदस्त्यातच, प्रशासन अधिकाऱ्याकडून लपवाछपवी!

कामासाठी पैशाची मागणी

सांजेकर या प्राध्यापकांना धमकावतात, उद्धट व अपमानास्पद बोलतात, कामासाठी पैशाची मागणी करतात, वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करतात आणि वरिष्ठांच्या अधिकारात हस्तक्षेप करतात आणि पदाचा गैरवापर करतात अशी तक्रारही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने २४ मे २०२३ रोजी उच्च शिक्षण संचालकांकडे केली होती.

सांजेकरांची मनमानी, सहसंचालकांनाही मोजेनात!

सांजेकर या विभागीय सहसंचालक कार्यालयात मनमानी करतात. कामानिमित्त कार्यालयात आलेल्या व्यक्तींना भेट देत नाहीत. दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास फोनही उचलत नाहीत, अशीही तक्रार आहे. विशेष म्हणजे सांजेकर या विभागीय सहसंचालक कार्यालय म्हणजे आपली खासगी मालमत्ता आहे, असे गृहित धरूनच वर्तन करतात. मनाला वाटेल तेव्हा त्या कार्यालयात येतात आणि घरी निघून जातात. घरी निघून जाण्यापूर्वी त्या सहसंचालकांची पूर्वपरवानगीही घेत नाहीत, अशाही तक्रारी आहेत. भरउन्हाळ्यात एखादेवेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सहसंचालकांसह सर्व कर्मचारी कार्यालयात बसून कामकाज करत असताना सांजेकर या मात्र उकाडा सहन होत नाही म्हणून परस्पर घरी निघून जात असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शी आणि कार्यालयातील कर्मचारी सांगतात. आजही सांजेकर हवे तेव्हा कार्यालयात येतात आणि घरी निघून जातात, अशी त्यांच्याबाबत तक्रार आहे.

हेही वाचाः उच्च शिक्षण संचालनालयाची विभागीय कार्यालये बनली भ्रष्टाचार, नियमबाह्य कामाचे अड्डे; कोल्हापुरातील कारवाईने पाडले पितळ उघडे!

कार्यालयीन शिस्तीची भंग

या सर्व तक्रारींमुळे कार्यालयाची नाचक्की होत असून विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. आपली कृती बेजबाबदारपणाची व कार्यालयीन शिस्तीस धरून नसल्याने अशा तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपण महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ३(एक)(दोन)(तीन) चा भंग केल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट होत आहे. त्यामुळे आपल्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा दिवसांत सादर करावा, असे उच्च शिक्षण संचालकांनी सांजेकरांना बजावले आहे. ५ जुलै रोजी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचाः सहसंचालकांचे पद व्यक्ती सापेक्ष की ‘नियम दक्ष’? प्राचार्य अग्नीहोत्री प्रकरणात डॉ. धामणस्कर-देशपांडेंच्या भूमिकेमुळे संशयाचे मळभ!

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी प्रशासन अधिकारी यू. व्ही. सांजेकरांना दोन पानी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या नोटीशीवर पुढील कार्यवाही केव्हा आणि कशी होते, याची औरंगाबाद विभागातील प्राध्यापकांना प्रतीक्षा आहे.

हेही वाचाः प्राचार्य डॉ. अग्नीहोत्री प्रकरणात ‘साप सोडून भुई धोपटण्याचा’ सहसंचालकांचा प्रयत्न, एचटीई सेवार्थसाठी जोरदार आटापिटा!

प्राध्यापक म्हणतात ‘झिंगूर’ अधिकाऱ्याकडून अपमान सहन कसा करायचा?

सांजेकर यांनी औरंगाबाद विभागातील प्राध्यापकांच्या आत्मसन्मानालाच ठेच पोहोचवली आहे. त्यामुळे विभागातील प्राध्यापक त्यांच्यावर कमालीचे संतप्त झालेले आहेत. सांजेकर या विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी आहेत, त्यांच्यापेक्षा प्राध्यापकांचा दर्जा वरिष्ठ आहे. असे असतानाही खालच्या दर्जाच्या पदावर असलेल्या सांजेकर आपल्यापेक्षा वरिष्ठ दर्जा असलेल्या प्राध्यापकांशी पातळी सोडून बोलतात, त्यांना अपमानित करतात, अरेरावी करतात, अशी औरंगाबाद विभागातील प्राध्यापकांची मुख्य तक्रार आहे. सांजेकरांनी प्राध्यापकांचा आत्मसन्मानच दुखावल्याची सल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या दोन तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. आता सांजेकरांविरुद्ध उच्च शिक्षण संचालकांनी शिस्तभंगाच्या कारवाईची सुरू केलेली प्रक्रिया मार्गा लागून औरंगाबाद विभागातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सांजेकरांपासून मुक्ती मिळते, की कारवाईची ही प्रक्रिया केवळ फार्स ठरते, हे नजीकच्या काळात पहायला मिळणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!