गडचिरोलीः राज्यातील सरकार सैरभैर झाले असून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा भाजपचा डाव असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर वडेट्टीवार हे पहिल्यांदाच गडचिरोलीत आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याचे खंडन करण्यात आले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांना पर्मनंट आरोग्याच्या दृष्टीने ऍडमिट करायचे आणि आरोग्याचे कारण पुढे करून राजीनामा घ्यायचा आणि अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न तर सुरू नाही ना? अशी शंका घेण्यास पूर्ण वाव आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
हा सर्व प्रकार भाजपचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाली, असा दावाही त्यांनी केला.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला त्यांच्या तब्येतीची काळजी असते. त्यामुळे याबाबत स्पष्ट खुलासा होणे अपेक्षित आहे. ते एका पक्षाचे नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले.
विधिमंडळ अधिवेशनातील सहभाग जेमतेमच!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधिमंडळ अधिवेशन काळातील सहभागसुद्धा अत्यंत कमी होता. तेरा दिवसांच्या अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत केवळ दोनवेळा गेले तर विधानसभेत चारवेळा गेले. त्यांची उपस्थितीही दीड-दोन तासांची होती. ही उपस्थिती, त्यांचा सहभाग, सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळणे, आराम करायला बाहेर जाणे, तब्येतची काळजी घेणे शंकास्पद आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.