‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलतीचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, आता कमी तिकिटात पाहता येणार चित्रपट!


मुंबईः क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपटाला राज्य वस्तू सेवाकरात सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील चित्रपटगृहात हा चित्रपट कमी तिकिटात पहायला मिळणार आहे.

म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या ‘सत्यशोधक’ चित्रपटामुळे अस्पृश्यता निवारण, शिक्षणप्रसार, सामाजिक सुधारणांसाठी फुले दाम्पत्याने घेतलेले कष्ट, केलेला त्याग, त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रेरणादायी लढा सर्वांसमोर येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या चित्रपटाला करसवलत देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी ८ जानेवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या चित्रपटाला करसवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हा चित्रपट कमी तिकिटदरात पहायला मिळणार आहे. सत्यशोधक चित्रपटाला करसवलत दिल्याबाबतचा शासन आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून ३० एप्रिलपर्यंतच्या कालावधीत चित्रपटगृहांनी प्रेक्षकांकडून एसजीएसटी वसूल न करता ती रक्कम स्वतः शासनाच्या तिजोरीत भरावी, त्यांना त्या रकमेचा परतावा करण्यात येईल, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परतावा देण्यासाठीची कार्यपद्धती राज्य विक्रीकर आयुक्त निश्चित करणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!