बारावीच्या गणित पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांसह पाच आरोपींना अटक, सिंदखेडराजात खळबळ


बुलढाणाः बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे इयत्ता बारावीचा गणिताच्या पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांसह पाच आरोपींना अटक केली आहे. या पेपरफुटी प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत लवकरच पोहोचू, असे सूतोवाच पोलिसांनी केले आहे.

३ मार्च रोजी इयत्ता बारावीचा गणिताचा पेपर होता. या पेपरची दोन पाने सकाळी साडेदहा वाजताच व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती. या पेपरफुटीचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या प्रकरणाची दखल घेत सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सिंदखेडराजा पोलिसांकडून हे प्रकरण साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी दोन जण शिक्षक आहेत तर तीन जण स्थानिक नागरिक आहेत. आता या पेपरफुटी प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये गणेश नागरे, पवन नागरे, गणेश पालवे आणि गोपाल शिंगणे या आरोपींचा समावेश आहे. पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. या आरोपींच्या चौकशीतून या पेपरफुटी प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल, असे पोलिसांना वाटते.

या पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गणिताच्या पेपरची फेर परीक्षा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे कुठेही आढळून आले नाही. त्यामुळे फेरपरीक्षा होणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!