सत्यशोधक नेत्या सरोज कांबळे मृत्यूप्रकरणी आरोपी मुलगा इनायत परदेशीची धुळे पोलिसांसमोर शरणागती!


धुळेः सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या नेत्या आणि अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक सरोज कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला त्यांचा मुलगा इनायत रणजित परदेशी याने आज बुधवारी धुळे पोलिसांसमोर शरणागती पत्करली. उद्या गुरूवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

न्यूजटाऊनने सरोज कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडली होती आणि सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावाही केला होता. सरोज कांबळे मृत्यूप्रकरणाचे सत्य न्यूजटाऊनने निर्भिडपणे मांडल्यामुळे महाराष्ट्रातील सत्यशोधकी, मार्क्सवादी चळवळ हादरून गेली होती.

हेही वाचाः सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या नेत्या सरोज कांबळे यांचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवाल गुलदस्त्यात!

इनायत परदेशी हा गेल्या चार-पाच वर्षांपासून आई सरोज कांबळे यांचा अमानुष आणि हिंस्त्र पद्धतीने छळ करत होता. या छळाचे पुरावेच न्यूजटाऊनने समोर आणले होते. आपण केलेला छळ आणि मारहाणीमुळे आपली ६६ वर्षीय आई सरोज कांबळे यांचा मृत्यू होऊ शकतो, याची पुरेपुर जाणीव असूनही त्याने हे अमानुष छळ सत्र सुरूच ठेवले होते. त्यातच ५ जून रोजी सरोज कांबळे यांचा धुळ्यात संशयास्पद मृत्यू झाला होता.

इनायत परदेशी याने आई सरोज कांबळे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता आणि लवकर अंत्यसंस्कार उरकून घेण्याची घाईही तो करत होता. परंतु काही कार्यकर्त्यांना सरोज कांबळे यांचा मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले होते. इनायत परदेशी हा सरोज कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास विरोध करत असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पोलिसांनी सरोज कांबळे यांचा मृतदेह शववाहिनीवरून खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता.

हेही वाचाः मुलगा ईनायत परदेशीच करायचा सत्यशोधक विचारवंत सरोज कांबळे यांचा अमानुष छळ; धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनकडे!

कोणीही तक्रारदार नसल्याचे सांगत आधी धुळ्याच्या आझादनगर पोलिसांनी सरोज कांबळे संशयास्पद मृत्यूप्रकरणी साधी प्राथमिक चौकशीही सुरू केली नव्हती. नंतर मात्र न्यूजटाऊनने या प्रकरणाचा सातत्याने केलेला पाठपुरावा आणि दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदवले होते.

सरोज कांबळे यांच्या ज्येष्ठ भगिनी सुधा सुकदेव काटकर आणि त्यांची कन्या जयश्री यांनाही पोलिसांनी जबाबासाठी बोलावले होते. इनायत परदेशीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत पोलिसांनी जवळपास सात जणांचे जबाब नोंदवून घेतले होते.

सरोज कांबळे यांच्या ज्येष्ठ भगिनी सुधा सुकदेव काटकर (वय ८१ वर्षे, रा. कल्याण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळ्याच्या आझादनगर पोलिसांनी १७ जून रोजी इनायत परदेशीविरुद्ध भादंविच्या ३०४ कलमानुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर धुळे पोलिसांनी इनायतच्या शोधासाठी दोन पथकेही स्थापन केली होती. ही पथके नाशिक आणि मालेगाव येथे जाऊन आली होती. परंतु इनायत या पथकाच्या हाती लागला नव्हता.

हेही वाचाः सरोज कांबळे मृत्यूप्रकरणी तपासात हस्तक्षेप करणाऱ्याना आरोपी कराः दिशा पिंकी शेख; सत्य महाराष्ट्राला सांगाः प्राचार्य कांबळे

बुधवारी दुपारी (२१ जून) रोजी इनायत परदेशी धुळ्याच्या आझादनगर पोलिस ठाण्यात स्वतःच हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी आणि इतर प्रक्रिया सायंकाळपर्यंत पूर्ण केली. गुरूवारी त्याला धुळे न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली. इनायतच्या शरणागतीमुळे सरोज कांबळे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणातील एकेक पदर उलगडत जाण्याची शक्यता आहे.

इनायतचा मोबाइल सीडीआर ठरणार महत्वाचा दुवा

सरोज कांबळे यांचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा घरात फक्त प्रा. रणजित परदेशी आणि इनायत परदेशी असे दोघेच होते. धुळ्यातील काझी प्लाट, नटराज टॉकीजसमोर त्यांचे घर आहे. सरोज कांबळे यांच्या मृत्यूच्या आधी आणि मृत्यूच्या नंतर इनायतने अनेकांशी मोबाइलवरून संपर्क साधल्याचे सांगण्यात येते.  त्यामुळे इनायत परदेशीचा मोबाइल सीडीआर या एकूणच प्रकरणात महत्वाचा दुवा ठरणार आहे.

हेही वाचाः सत्यशोधक मार्क्सवादी नेत्या सरोज कांबळे मृत्यूप्रकरणः अत्यवस्थ प्रा. रणजित परदेशींना घेऊन इनायत परदेशी फरार, घर कुलुपबंद!

या मोबाइल संभाषणात इनायत परदेशी कोणाकोणाशी नेमके काय बोलला?  सरोज कांबळे यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत त्याने काही चर्चा केली का? आपल्यामुळेच आई सरोज कांबळे यांना जीव गमवावा लागला अशी कबुली त्याने काही जणांशी मोबाइलवरून बोलताना दिली का?  अशा अनेक प्रश्नांचा उलगडा इनायत परदेशीच्या मोबाइल सीडीआरमधून होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः न्यूजटाऊन इम्पॅक्टः सत्यशोधक नेत्या सरोज कांबळे मृत्यूप्रकरणी मुलगा इनायत परदेशीविरुद्ध अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुढील तपासाचा भाग म्हणून आझादनगर पोलिस इनायत परदेशीच्या मोबाइलचा सीडीआरही ताब्यात घेऊ शकतात आणि त्या मोबाइल सीडीआरचा न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना पुरावा म्हणून वापरही करण्याची शक्यता आहे.

अत्यवस्थ प्रा. रणजित परदेशींवर नाशिकमध्ये उपचार

 दरम्यान, गंभीर आजारामुळे अत्यवस्थ असलेले सत्यशोधक मार्कस्वादी चळवळीचे नेते आणि सरोज कांबळे यांचे पती प्रा. रणजित परदेशी यांना आज नाशिक येथे उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले आहे. सरोज कांबळे मृत्यूप्रकरणात संशयाची सुई इनायत परदेशीच्या दिशेनेच वळू लागल्यानंतर आपल्याविरोधात कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आपणाला अटकही केली जाऊ शकते, याचा अंदाज आल्यामुळे  इनायत परदेशी हा वडील प्रा. रणजित परदेशी यांना घेऊन धुळ्यातून १४ जून रोजी निघून गेला होता. तो कुठे गेला याची कुणालाही कल्पना देण्यात आली नव्हती. नंतर तो मालेगावला प्रा. परदेशी यांच्या  भावाकडे गेल्याचे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, प्रा. रणजित परदेशी यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिक येथील रुग्णालयात प्रा. रणजित परदेशी यांना दाखल करून इनायत परदेशी धुळे पोलिसांसमोर शरणागती पत्करण्यास आल्याचे सांगण्यात येते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *