
मुंबईः राज्यातील थंडीचा जोर आता ओसरणार असून राज्याच्या काही भागात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकरणार असल्याने पूर्व-ईशान्येकडे दाब वाढणार आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावरही होणार आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
डिसेंबरच्या पूर्वार्धात राज्यात गोठवणारी थंडी पडली. अनेक शहरांचे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. परंतु आता राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यातच आता २४ व २५ डिसेंबर रोजी राज्याच्या काही भागात विशेषतः विदर्भात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आर्द्रतेत वाढ होणार आहे. काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील थंडी ओसरणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मराठवाड्याच्या बहुतांश भागात गारठा कायम असला तरी किमान तापमानात वाढ झाली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्यामुळे निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार आहे. त्यामुळे पूर्व-ईशान्येकडील राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पूर्व व पश्चिम विदर्भात पुढील दोन दिवसात म्हजेच २४ व २५ डिसेंबर रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पहायला मिळण्याची शक्यता आहे.
