छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांना पदावरून तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्याच (औरंगाबाद) शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे पुन्हा एकदा विभागीय सहसंचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शुक्रवारी हा आदेश जारी केला.
डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी २ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय सहसंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. कार्यभार स्वीकारल्यापासूनच त्यांची कामकाजाची पद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. न्यूजटाऊनने त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर वारंवार बोट ठेवले होते. उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी २० जुलै २०२३ रोजी डॉ. ठाकूर यांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.
मुंबईचे तत्कालीन विभागीय सहसंचालक डॉ. केशव तुपे यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय चौकशी समितीने छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय उच्च शिक्षण कार्यालयातील नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामकाजाची चौकशी केली होती आणि चौकशी अहवाल उच्च शिक्षण संचालनालयाकडे सादर केला होता.
या चौकशीनंतर डॉ. सुरेंद्र ठाकूर यांची विभागीय सहसंचालकपदावरून गच्छंती अटळ असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी डॉ. ठाकूर यांना काल शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) कार्यमुक्त केले आहे. ते आता छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक या आपल्या मूळ पदावर रूजू होतील.
डॉ. ठाकूर यांच्याकडून कार्यभार काढून तो आता छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. डॉ. ठाकूर यांच्याआधी विभागीय सहसंचालकपदाचा कार्यभार डॉ. सतीश देशपांडे यांच्याकडेच होता. डॉ. देशपांडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्याकडील पदभार डॉ. ठाकूर यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र अवघ्या वर्षभरातच त्यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला आहे.
ठाकूर यांना काय भोवले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २६ बोगस तदर्थ प्राध्यापकांच्या कॅसच्या प्रकरणात डॉ. ठाकूर यांनी परस्पर केलेला अतिशहाणपणा त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. या बोगस प्राध्यापकांसंदर्भात न्यूजटाऊनने तब्बल दीडमहिना मालिका प्रकाशित केली होती. विहित प्रक्रियेचे पालन न करताच ई-सेवार्थ प्रणालीत समावेश करून नियमित करण्यात आलेल्या या प्राध्यापकांना कॅसचे लाभ देण्यासाठी डॉ. ठाकूर यांनी पुढाकार घेतला होता.
जालन्याच्या जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री यांना दिलेली नियमबाह्य मान्यता, खुलताबादच्या चिश्तिया महाविद्यालयातील बोगस प्राध्यापकांच्या प्रकरणात डॉ. ठाकूर यांनी घेतलेली भूमिकाही वादग्रस्त ठरली आहे.
न्यूजटाऊनने राज्यातील अनुदानित महाविद्यालयानी तब्बल १० हजार कोटींचा घोटाळा केल्याच्या प्रकरणातही डॉ. ठाकूर यांनी न्यूजटाऊनला नोटीस बजावली होती आणि त्याचे खापर उच्च शिक्षण संचालकांवर फोडले होते. ते प्रकरणही त्यांना चांगलेच भोवले.
प्रशासन अधिकारी सांजेकरांचे काय?
डॉ. सुरेंद्र ठाकूर यांच्याकडून विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदाचा कार्यभार काढून घेऊन त्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवण्यात आले असले तरी डॉ. ठाकूर यांच्यासोबतच डॉ. केशव तुपे चौकशी समितीने चौकशी केलेल्या याच कार्यालयातील प्रशासन अधिकारी तथा वेतन पथक प्रमुख व्ही. यू. सांजेकर यांच्यावर मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
हेही वाचाः चौकशी समितीसमोर सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर, प्रशासन अधिकारी सांजेकरांविरुद्ध तक्रारींचा पाऊस!
सांजेकर यांच्याबद्दल विभागातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षण संस्थाचालकांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्या तक्रारींची दखल घेत उच्च शिक्षण संचालकांनी या आधीच सांजेकरांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती.
कार्यालयीन शिस्तीचा भंग आणि उच्च शिक्षण विभागाची नाचक्की केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. शिस्तभंगाच्या कारवाईची ही प्रक्रिया सुरू असतानाच सांजेकरांना नव्या उच्चस्तरीय चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. परंतु नंतर सांजेकरांच्या विरुद्धच्या शिस्तभंगाच्या कारवाईचे आणि त्यांच्या उच्चस्तरीय चौकशीचे काय झाले? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
More case are also running there in jalna j.e.s college, about teachers permanent joining.mrs patni ,mrs tapde,mrs malani ,ghatre .