छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): विभागीय सहसंचालक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर झालेली अनियमितता आणि शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक पिळवूणक याबाबतच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एक सदस्यीय चौकशी समितीसमोर सहसंचालक डॉ, सुरेंद्र ठाकूर आणि प्रशासन अधिकारी व्ही. यू. सांजेकर यांच्याविरोधात तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. आता या चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालक कार्यालयात प्रचलित नियम व कायदे धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याच्या असंख्य तक्रारी उच्च शिक्षण संचालकाकडे करण्यात आल्या होत्या. सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर, प्रशासन अधिकारी वनिता उदयराव सांजेकर यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मुंबईचे विभागीय सहसंचालक डॉ. केशव तुपे यांची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.
डॉ. तुपे समिती गुरूवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली आणि शुक्रवारी या समितीने चौकशीचे कामकाज सुरू केले. या चौकशी समितीसमोर शुक्रवारी अनेक प्राध्यापक संघटना, शिक्षण संस्थाचालकांनी सहसंचालक डॉ. ठाकूर, प्रशासन अधिकारी सांजेकर यांच्या विरोधात तक्रारी आणि पुरावे सादर केले. त्यात अनेक तक्रारी गंभीर स्वरुपाच्या आहेत. पैसे दिल्याशिवाय सहसंचालक कार्यालयात इकडचा कागद तिकडे हालत नसल्याच्याही तक्रारी आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या चौकशी समितीचे कामकाज सुरू होते.
डॉ. तुपे चौकशी समितीसमोर सादर केलेल्या सर्वाधिक तक्रारी प्रशासन अधिकारी सांजेकर यांच्या विरोधात आहेत. सांजेकरांनी शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कशी आर्थिक पिळवणूक केली आणि नियम धाब्यावर बसवून कसे कामकाज केले याचा पाढाच या चौकशी समितीसमोर वाचण्यात आला आहे. आता ही चौकशी समिती उच्च शिक्षण संचालकांकडे अहवाल सादर करणार असून त्यानंतर या दोघांविरुद्ध काय कारवाई करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे.
ज्यांची चौकशी, त्यांच्याच सोबत समितीने झोडला पाहुणचार
डॉ. केशव तुपे यांची एक सदस्यीय चौकशी समिती सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर आणि प्रशासन अधिकारी सांजेकर यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करत आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत कामकाज आटोपल्यानंतर डॉ. तुपे यांचा डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी पाहुणचार केला. डॉ. ठाकूर आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय जगताप हे डॉ. तुपे यांना घेऊन पदमपुऱ्यातील कैलास हॉटेलमध्ये गेले. तेथे डॉ. तुपे यांनी ठाकूर यांच्यासमवेत भोजनाचा आस्वाद घेतला आणि ते परत चौकशीसाठी विभागीय सहसंचालक कार्यालयात दाखल झाले.
ज्यांची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली, त्याच डॉ. ठाकूर यांच्यासमवेत चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. तुपे यांनी पाहुणचार झोडल्यामुळे ही चौकशी समिती डॉ. ठाकूर यांच्याबाबत कितपत तटस्थ चौकशी करणार? अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे.