
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारितील समाजकार्य महाविद्यालये उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला आहे. या महाविद्यालयांसंबंधीच्या सर्व नस्त्या आणि कागदपत्रे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे तत्काळ हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
बी. एस. डब्ल्यू. आणि एम.एस. डब्ल्यू. हा अभ्यासक्रम चालवणारी समाजकार्य महाविद्यालय हा विषय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सामासु कार्यासनाद्वारे हाताळण्यात येत आहे. परंतु उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत महाविद्यालयीन शैक्षणिक पद्धतीची अंमलबजावणी व शैक्षणिकविषयक कामकाज हाताळण्यात येत असल्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारितील समाजकार्य महाविद्यालये (बी. एस. डब्ल्यू. आणि एम.एस. डब्ल्यू. अभ्यासक्रम) उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने समाजकार्य महाविद्यालये उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचा शासन निर्णय २९ फेब्रुवारी रोजी जारी केला आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सामासु कार्यासनाने समाजकार्य महाविद्यालयांसंबंधीच्या सर्व नस्त्या आणि कागदपत्रे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे तत्काळ हस्तांतरित करण्याचे आदेशही या शासन निर्णयात देण्यात आला आहे.
याच आदेशामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सामासु कार्यासनातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाला या नस्त्या कुठून द्यायच्या आणि कोणत्या द्यायच्या हा प्रश्न या अधिकाऱ्यांना भंडावून सोडत आहे.
प्राध्यापकांच्या मान्यता, कार्यभारापेक्षा जास्त पदभरतीला मान्यता आणि वार्षिक वित्तीय मूल्यांकन न करताच अनुदानाचे वितरण असे अनेक घोटाळे या नस्ती हस्तांतरऩातून बाहेर येण्याचा धोका असल्यामुळे आणि त्याची जबाबदारी अंगावर येण्याच्या भीतीमुळे सामाजिक न्याय विभागातील संबंधित अधिकारी बेजार झाले असल्चाची माहिती सूत्रांनी दिली.
