बारामतीत येतच आहात तर घरी जेवायला या, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ‘स्नेहभोजना’ची गुगली!


बारामतीः  शरद पवारांनी उभारलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये २ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु या कार्यक्रमाला शरद पवार यांना निमंत्रितच करण्यात आलेले नाही. त्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात असतानाच शरद पवार यांनी मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी सस्नेह भोजनाचे निमंत्रण दिले आहे. शरद पवारांनी टाकलेल्या या गुगलीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. २०१५ च्या शासन निर्णयानुसार अशा कार्यक्रमांना स्थानिक लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना निमंत्रित करावे लागते आणि निमंत्रणपत्रिकेत त्यांची नावेही टाकावी लागतात. परंतु बारामतीतील या कार्यक्रमासाठी शरद पवारांना निमंत्रणही देण्यात आले नाही आणि निमंत्रणपत्रिकेत त्यांचे नावही टाकण्यात आले नाही.

शरद पवार हे संस्थापक सदस्य असलेल्या विद्यानगरीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार हेच या संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीतील अतिथी निवासात चहापानासाठी आणि बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून त्याच्या प्रतिलिपी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आपण २ मार्च रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे मला समजले. सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य म्हणून मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित रहायला आवडेल. या कार्यक्रमाचे आयोजन मी संस्थापक सदस्य असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानावर करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. करिता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रित करतो, असे शरद पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमच येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून यापूर्वीच निमंत्रण दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह या निमंत्रणाचाही विचार करावा. दोन्ही सस्नेह निमंत्रणाचा आपण स्वीकार कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असेही शरद पवार यांनी या पत्रात म्हटले आहे. शरद पवारांच्या या गुगलीला आता मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!