पुणेः डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव-भीमा परिसरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरूण फरेरा यांची आज (५ ऑगस्ट) पाच वर्षांनंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली.
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेनंतर कोरेगाव-भीमा परिसारत हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) कायद्यान्वये सामाजिक कार्यकर्ते व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरूण फरेरा यांना अटक करण्यात आली होती. या दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर या दोघांची आज तुरूंगातून सुटका करण्यात आली.
पुण्यात सामाजिक विषयांवर एल्गार राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा परिसरात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. या हिंसाचारात एक जण ठार तर काही जण जखमी झाले होते. या हिंसाचाराला एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनाच जबाबदार धरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काही सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केली होती. तेव्हापासून ते नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात होते.
तब्बल पाच वर्षे हे दोघेही तुरूंगात होते. दरम्यान गोन्साल्वीस आणि फरेरा यांच्यासह सहआरोपी असलेल्या सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने आधीच जामीन मंजूर केला होता. परंतु या दोघांचे जामीन अर्ज नामंजूर करण्यात आले होते. त्यानंतर या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने काही अटी-शर्ती घालून २८ जुलै रोजी या दोघांना जामीन मंजूर केला होता.