नवी दिल्लीः देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले असतानाच आता टोमॅटोपाठोपाठ कांद्याचे भावही वधारण्याची शक्यता आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात कमतरता असल्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात विक्रमी वाढ होण्याची शक्यता एका अहवालात वर्तवण्यात आली आहे. ही भाववाढ सुमारे ६० ते ७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात टोमॅटोचे भाव चांगलेच वधारले आहेत. टोमॅटो कुठे १२ रुपये किलो तर कुठे २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. काही ठिकाणी टोमॅटोच्या दरात दिलासा मिळाला असला तरी आता टोमॅटोपाठोपाठ कांद्याच्या भावातही विक्रमी वाढ होण्यची शक्यता क्रिसिल मार्टेक इंटेलिजन्स अँड ऍनालिटिक्सच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे भाव २८ ते ३० रुपये प्रतिकिलो आहेत. मात्र या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात विक्रमी वाढीची शक्यता आहे. पुरवठ्यात कमरता असल्यामुळे कांद्याचा भावात ६० ते ७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एवढी किंमत वाढल्यानंतरही कांद्याच्या वाढलेल्या किंमती २०२० च्या सर्वोच्च पातळीच्या तुलनेत खालीच राहणार आहे, असे क्रिसिलच्या या अहवालात म्हटले आहे.
रब्बी कांद्याचे शेल्फ लाइफ एक-दोन महिन्यांनी कमी झाल्यामुळे आणि यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यातच विक्री झाल्यामुळे खुल्या बाजारात रब्बीच्या कांद्याचा साठा सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीसच लक्षणीयरित्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात पुरवठ्याची कमरता होणार असून भाव वाढ होण्याची शक्यता आहे, असे क्रिसिल मार्टेक इंटेलिजन्स अँड ऍनालिटिक्सच्या अहवालात म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे नवीन पिक आल्यानंतर भाव पुन्हा खाली घसरतील, असा अंदाज आहे. ऑक्टोबर-डिसेंबर या सणासुदीच्या महिन्यात किंमतीतील चढउतार स्थित राहण्याची अपेक्षाही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. जानेवारी ते मे या काळात डाळी, धान्य आणि इतर भाज्यांचे भाव वाढले होते. परंतु कांद्याच्या भावाने नागरिकांना दिलासा दिला होता.
कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी कांद्याची कमी लागवड केली आहे. त्यामुळे यावर्षी कांद्याच्या पेरणीच्या क्षेत्रात ८ टक्क्यांनी घट होणार असून खरीप कांद्याच्या उत्पादनाते दरवर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी घट होणार आहे. कांद्याचे वार्षिक उत्पादन २९ दशलक्ष टन अपेक्षित आहे. ते गेल्यावर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी जास्त आहे.