मराठवाड्याने ‘कडक शिस्तीचा मास्तर’ गमावला, प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे निधन


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  मराठवाड्यातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त आणि ज्यांच्या कडक शिस्तीतून जेएनईसी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नावलौकिक मिळाला ते प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे आज (५ ऑगस्ट) रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले. सायंकाळी वाजता त्यांच्या पार्थिवावर एमजीएम स्टेडियमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राचार्य बोराडे यांच्या निधनामुळे मराठवाड्याने एक सक्षम शैक्षणिक नेतृत्व गमावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी प्राचार्य बोराडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 प्राचार्य प्रतापराव बोराडे यांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक आणि समाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. एमजीएमच्या जवाहलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (जेएनईसी) दोन दशकांहून अधिक काळ प्राचार्य म्हणून काम केले. त्यांच्या कडक शिस्तीतूनच जेएनईसीचा नावलौकिक देशभर पसरला. या महाविद्यालयाच्या शैक्षणिक उभारणीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.

प्राचार्य बोराडे हे अभियांत्रिकीमध्ये दुहेरी पदवीधर होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीतही त्यांनी महत्वाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून २०२० मध्ये मसापचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

प्राचार्य प्रतापराव बोराडे यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कडक शिस्त पाहून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नेले होते. तेथे त्यांनी काही काळ प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना मदत करण्यात ते नेहमीच अग्रेसर असायचे. विविध व्यावसायिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. प्राचार्य बोराडे हे एमजीएम संस्थेशी १९८२ पासून जोडले गेलेले होते.

ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्वः शरद पवारांकडून शोकसंवेदना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त,विद्या प्रतिष्ठान,बारामतीचे माजी प्रशासकीय अधिकारी, ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आज दुःखद निधन झाल्याची बातमी समजली.

मागील पाच दशके प्रतापरावांचा आणि माझा स्नेह होता. जगभरात एखादा देश क्वचितच आढळेल जिथे त्यांचा विद्यार्थी सापडणार नाही. आपल्या ज्ञानदानाने व उत्तम प्रशासकीय कौशल्याने त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था नावारूपास आणल्या. राज्यातील अनेक परिवर्तनवादी संघटना व संस्था यांच्यासोबत त्यांचा संवाद होता. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते आग्रही होते. आज त्यांच्या निधनाची बातमी ही मला वैयक्तिक वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांना व एमजीएम परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. प्रतापरावांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन, असे शरद पवारांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!