प्रतीक्षा संपलीः केरळमध्ये मान्सूनचे आगमन, हवामान विभागाकडून पुढील तीन-चार दिवस अर्ध्याअधिक महाराष्ट्रात मान्सूनपूर्व मुसळधार पावसाचा इशारा


नवी दिल्ली/मुंबईः नेहमीपेक्षा तीन दिवसांनी उशिरा का होईना पण आज गुरूवारी अखेर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या अनुकुल परिस्थिती बनत असून येत्या काही दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवसांसाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज तर बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस साधारणपणे १ जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल होत असतो. मात्र यंदा समुद्र आणि वातावरणातील काही बदलांमुळे मान्सूनच्या आगमनाला तीन दिवसांचा विलंब झाला आहे. अखेर गुरूवारी हवामानविषय निकष पूर्ण झाल्यानंतर हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा केली.

मोसमी पावसाने अरबी समुद्रातील दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व भाग, मध्य अरबी समुद्रातील काही भाग, लक्षद्वीप बेटे, केरळ आणि माहेचा संपूर्ण प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरातील विस्तृत क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाळ्याची अधिकृत सुरूवात झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

गेल्या वर्षी २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ मे रोजी दाखल झाला होता. तर २६ मे रोजी मुंबईत मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा नैऋत्य मान्सून आगमनाच्या सरासरीच्या वेळेपेक्षा तीन दिवस उशिराने केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. मोसमी वारे पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मोसमी पावसाच्या आगमनासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण होत आहे. मोसमी पावसाच्या प्रगतीचा वेग कायम राहिल्यास महाराष्ट्रात लवकरच पावसाळ्याची सुरूवात होण्याची शक्यता आहे.

राज्यात तीन दिवस मान्सूनपूर्व मुसळधार!

राज्यात सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

 हवामान विभागाने बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, नाशिक घाट, कोल्हापूर, सांगली, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, रायगड, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याना शुक्रवारसाठी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ६० किलोमीटरपर्यंत असू शकतो. मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

पेरणीची घाई नको

महाराष्ट्रात सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ याच पावसाच्या भरवश्यावर पेरणीची घाई करू नये. सासत्यपूर्ण आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी सुरू करावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!