
नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेतील १२ महसूल अधिकाऱ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) पदोन्नती दिली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या पदोन्नतींवर शिक्कामोर्तब केल्यानंतर भारत सरकारचे अवर सचिव संजयकुमार चौरासिया यांच्या स्वाक्षरीने यासंबंधीची अधिसूचना १४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भारतीय प्रशासन सेवा (भरती) नियमाच्या नियम ८(१), भारतीय प्रशासन सेवा (पदोन्नतीद्वारे नियुक्ती) नियमाच्या नियम ९(१) आणि भारतीय प्रशासन सेवा (परीवीक्षा) नियमाच्या नियम ३ नुसार राष्ट्रपतींनी महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतील १२ महसूल अधिकाऱ्यांना महाराष्ट्र केडरमध्ये भारतीय प्रशासन सेवेत रिक्त असलेल्या पदांवर २०२४ च्या निवड यादीत पदोन्नती देण्यात आली आहे, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.
२०२४ च्या निवड यादीत १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या काळात रिक्त झालेल्या पदांवर ही पदोन्नती देण्यात आली आहे. मुंबई मॅटमध्ये प्रलंबित असलेले प्रकरण क्रमांक २३६/२०२१ णि २३७/२०२१ आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली रिट याचिका क्रमांक १९७/२०२५ च्या निकालाच्या अधीन राहून या नियुक्त्या करण्यात आल्याचेही या अधिसूचनेत म्हटले आहे.
आयएएस बनलेले १२ महसूल अधिकारी असे
- विजयसिंह शंकरराव देशमुख (जन्म दिनांक. २१/११/१९७२)
- विजय सहदेवराव भोकरे (जन्म दि. २८/१/१९७३)
- त्रिगुण शामराव कुलकर्णी (जन्म दि.६/५/१९७४)
- गजानन धोंडीराम पाटील (जन्म दि.२७/६/१९७४)
- महेश भास्करराव पाटील (जन्म दि. २०/४/१९७५)
- पंकज संतोष देवरे (जन्म दि. १२/६/१९७४)
- मंजिरी मधुसुदन मानोलकर (जन्म दि. १९/११/१९६८)
- आशा अफझलखान पठाण (जन्म दि. ८/८/१९६९)
- राजलक्ष्मी शफीक शाह (जन्म दि. ३१/५/१९७१)
- सोनाली निळकंठ मुळ्ये (जन्म दि. १२/५/१९७२)
- गजेंद्र चिंतामणराव भवने (जन्म दि. २७/६/१९६८)
- प्रतिभा समाधान इंगळे (जन्म दि. १९/१०/१९७५)
संपूर्ण क्षमता उपयोगात आणा
या १२ महसूल अधिकाऱ्यांना आयएएसपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रिव्हन्स अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल ट्रेनिंग विभागाने अधिसूचना जारी केली. महाराष्ट्र महसूल सेवेतील १२ अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेते पदोन्नत केले. महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी यासाठी या सर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे. म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगात आणावी, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
