छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): उद्योग नगरी वाळूज परिसरातील तिसगाव-वडगाव कोल्हाटी मार्गावर एका तरूणाची छातीत गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वाळूज परिसर हादरून गेला आहे.
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या तिसगाव-वडगाव कोल्हाटी मार्गावरील साईबाबा चौकात ही हत्या करण्यात आली. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास लगतच्या परिसरातील महिला कचरा टाकण्यासाठी आलेल्या असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरूण दिसला. घाबरलेल्या महिलांनी घरी येऊन हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर ही बाब सरपंच सुनील काळे यांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
छातीत गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव कपिल पिंपळे असून तो रांजणगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वाळूज एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरूवात केली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक गावठी कट्टा आणि गोळी झाल्यानंतर रिकामे राहिलेले एक काडतूस आढळून आले आहे.
या गोळीबारात ठार झालेला तरूण कपिल पिंपळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) हलवण्यात आला आहे. या घटनेमुळे वाळूज परिसर हादरून गेला आहे. कपिलची हत्या केल्यानंतर हल्लेखोराने गावठी कट्टा जागीच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.